खळबळजनक ! महिलादिनानिमित्त लसीकरण प्रशिक्षणासाठी आरोग्य सेविकांना दिलेल्या मोबाईल मध्ये अश्लील चित्रफीत

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – जागतिक महिलादिन आज जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पण नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिलादिनाच्या पूर्वसंध्येला नाशिक महापालिकेत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना दिलेल्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ आणि फोटो आढळून आले आहेत. या प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली असून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, केंद्र सरकारच्या आरोग्य विभागामार्फत देशभरातील लसीकरण करणाऱ्या आरोग्य सेविकांना लसीकरणासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. त्याअंतर्गत राज्य सरकार आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक महापालिकेतील ३० आणि मालेगाव महापालिकेतील १० आशा एकूण ४० आरोग्य कर्मचाऱ्यांना ६ आणि ७ मार्च रोजी प्रशिक्षण देण्यात आले. या मोबाईल्स मध्ये लसीकरणासंदर्भात सॉफ्टवेअर डाउनलोड करून देण्यात येणार होते. त्यासाठी नव्या मोबाईल फोन्सचे वितरण करण्यात आले. पण धक्कादायक बाब अशी की वितरित करण्यात आलेल्या ६ ते ७ मोबाइल्समध्ये अश्लील चित्रफिती आणि फोटो आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, मोबाईल्स तपासल्यानंतर लक्षात आले की, मोबाईल्समध्ये असलेले व्हिडीओ आणि फोटो हे २०१७ मध्ये डाऊनलोड केले आहेत. परिचारिकांना नवे मोबाईल्स दिले होते, तर त्यामध्ये २०१७ मध्ये डाऊनलोड केलेले व्हिडीओ कसे काय आले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे जुने मोबाईल्स फक्त नवे पॅकिंग करुन परिचारिकांना दिले असल्याचा आरोप केला जात आहे.

Loading...
You might also like