Budget 2020 : मुलींच्या लग्नाचं वय बदलणार ? निर्मला सीतारमण यांनी दिले संकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना मुलींच्या लग्नाच्या वयात बदल करण्याचे संकेत दिले. मुलींच्या पोषणाच्या दृष्टीकोनातून त्यांचं लग्नाचं वय बदलण्यात येईल असे संकेत अर्थमंत्र्यांनी दिलेत. यासाठी एका कृती दलाची स्थापना करण्यात येणार असून त्यांच्याकडून याबद्दलचा आढावा सरकार घेईल. त्यामुळे सरकार लवकरच मुलींच्या लग्नाचे वय बदलू शकते.

निर्मला सीतारमन यावर बोलताना म्हणाल्या की आधी वयाच्या 15 व्या वर्षी मुलींचे लग्न व्हायचे. 1978 मध्ये शारदा कायदा आणून त्यात बदल करण्यात आला. यानंतर मुलींच्या लग्नाचे वय 18 वर्षे करण्यात आले. मुलींच्या शारीरिक पोषणाच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. याच अनुषंगाने सरकारकडून एका कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्याकडून याबद्दलचा पुनर्विचार केला जाईल.

सीतारमन यांनी जाहीर केले की पोषणासंबंधी योजनांवर 35 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. मातांच्या आरोग्यासाठी पोषण अतिशय गरजेचे आहे. लहान मुलांसाठी देखील पोषण आवश्यक आहे. याबद्दलची माहिती देण्यासाठी अंगणवाडी सेविकेंना स्मार्टफोन देण्यात येतील. सहा लाख पेक्षा जास्त अंगणवाडी सेविका पोषण अभियानावर काम करत आहेत असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

सीतारमन म्हणाल्या की बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेला उल्लेखनीय यश मिळाले आहे. शाळेत जाणाऱ्या मुलींचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण मुलांपेक्षा आधिक आहे. मुली कोणत्याही क्षेत्रात मुलांपेक्षा कमी नाहीत.