ट्रेनमध्ये महिला किती सुरक्षित ? गेल्या 2 वर्षांत 165 बलात्कार आणि 542 खून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात रोज महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वीच हैद्राबादमधील सामुहिक बलात्कार आणि जळीतकांडाने संपूर्ण देश हादरला होता. पण, या घटना काही थांबलेल्या दिसत नाहीत. महिलांवरील अत्याचाराचे प्रकार सतत घडतच आहेत. भरवस्तीत गुन्हेगार महिलांना लक्ष्य करत आहेत. रेल्वेत आणि रेल्वे परिसरात अशा घटना घटना घडण्याचे प्रमाण तर चिंताजनक आहे. यासंबंधी महिती अधिकारातून उघड झालेली माहिती धक्कादायक आणि संबंधितांची झोप उडवणारी आहे. मागील दोन वर्षांमध्ये ट्रेन आणि रेल्वे परिसरात बलात्काराच्या एकूण 165 घटना घडल्या आहेत. तर मागील तीन वर्षांच्या कालावधीत 4718 लुटमारीच्या घटना घडल्या असून 542 लोकांचे खून झाले आहेत.

आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी दाखल केलेल्या आरटीआय अर्जामुळे ही माहिती उघड झाली आहे. 2017-2019 दरम्यान रेल्वे परिसरामध्ये बलात्काराच्या 136 घटना घडल्या आहेत. तसेच चालत्या ट्रेनमध्ये 29 महिलांसोबत घाणेरडी कृत्ये घडली आहेत. 2017 मध्ये एकूण 51 घटना घडल्या होत्या, तर 2019 मध्ये 44 तसेच 2018 मध्ये 70 महिलांवर अत्याचार झाला होता.

2017 मध्ये 51 महिलांसोबत दुर्व्यवहार झाला. यापैकी 41 महिलांवर रेल्वे परिसरात अत्याचार झाला आहे. तर 10 महिलांवर चालत्या ट्रेनमध्ये अत्याचार झाला आहे. याच कालावधीत बलात्कारांव्यतिरिक्त महिलांविरोधात केलेल्या गुन्ह्यांची 1672 प्रकरणे दाखल झाली आहेत. यात 802 रेल्वे परिसरात, तर 870 चालत्या ट्रेनमध्ये घडली आहेत. गेल्या वर्षी एकूण घडलेल्या एकुण 44 प्रकरणांमध्ये 36 प्रकरणे रेल्वे परिसरात घडली, तर ट्रेनमध्ये 8 प्रकरणे घडली. 2018 मध्ये घडलेल्या एकूण 70 प्रकरणांपैकी 59 घटना रेल्वे परिसरात घडल्या, तर 11 प्रकरणे ट्रेनमध्ये घडली.

542 हत्या, 213 गुन्ह्यांत हत्येचा प्रयत्न
खूनासारखे गंभीर प्रकारही मोठ्याप्रमाणात वाढले आहेत. अपहरणाची 771, आणि लुटमारीचे 4718 प्रकार घडले आहेत. एकुण 542 लोकांची हत्या झाली आहे, तर 213 हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल झाले आहेत.

सरकारचा दावा, पावलं उचलत आहोत
रेल्वेत आणि रेल्वे परिसरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर बनल्याचे माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीवरून दिसून येत आहे. मात्र, महिलांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली जात असल्याचा दावा सरकारने केला आहे. काही दिवसांपूर्वीच रेल्वे राज्यमंत्र्यांनी ही माहिती राज्यसभेत दिली होती. चिन्हांकित मार्ग, सेक्शन्समध्ये 2200 ट्रेनमध्ये आरपीएफ सुरक्षा, 2200 ट्रेनमध्ये जीआरपी सुरक्षा, सुरक्षा हेल्पलाइन 182, महिलांसाठी आरक्षित डब्यांमध्ये पुरुषांना बंदी, असे उपाय केल्याचे रेल्वे राज्यमंत्र्यांनी म्हटले होते. तसेच महिला विशेष डब्यांत महिला आरपीएफ कर्मचारी, ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आदी उपाय केल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले. 2018 आणि 2019 मध्ये अनुक्रमे 139422 आणि 114170 पुरुष प्रवाशांविरोधात गुन्हे केले आहेत.