‘महिला सुरक्षेचे विषय तरी किमान राजकारणाच्या पलिकडे असले पाहिजेत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. आज (शनिवार) भाजप महिला मोर्चाच्यावतीने राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन केली जात आहेत. भाजप महिला मोर्चाच्यावतीने मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी एक बातमी ट्विट करुन म्हटले आहे की, सरकार हे नेहमी पालकत्त्वाच्या भूमिकेत असले पाहिजे. आमची मागणी आहे की, केवळ दबावाचे, गळचेपीचे राजकारण न करता सरकारने आधी दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी. महिला सुरक्षेचे विषय तरी किमान राजकारणाच्या पलिकडे असले पाहिजेत, असे सरकारला सुनावलं आहे.

तसेच, सरकार दोषींवर कारवाई करीत नाही. पण, आंदोलन करणाऱ्या महिलांचेच अटकसत्र राबविण्यास शासनाला धन्यता वाटते. भाजपच्या महिला नेत्यांच्या छायाचित्रांशी छेडछाड करणाऱ्या विकृतीवर कारवाईची तत्परता न दाखविता, केवळ आवाज दडपण्याच्या या दबावतंत्राचा आम्ही तीव्र निषेध करतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील यांचा सरकारला इशारा
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. सोमवारच्या आत जर राज्य सरकारने संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही, त्यांची चौकशी सुरु केली नाही आणि मुख्यमंत्र्यांनी यावर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवेदन करावे, नाहीतर आम्ही या मुद्यावर तोंड न उघडणाऱ्या राज्य सरकारला अधिवेशनात तोंड उघडू देणार नाही. तसेच सभागृह चालू देणार नसल्याचा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.