महिला T-20 वर्ल्ड कप : पूनमच्या फिरकीची ‘जादू’, ऑस्ट्रेलियाचं ‘लोटांगण’, भारताची विजयी ‘सलामी’

सिडनी : वृत्तसंस्था – महिला टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताने पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. त्यांच्या घरच्या मैदानावर भारताने 17 धावांनी विजय मिळवला. या विजयाची शिल्पकार ठरली ती गोलंदाज पूनम यादव. भारताने दिलेल्या 132 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलिया सहज पार करेल असे वाटत होते. मात्र, सुरुवातीपासूनच भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व राखलं. भारताने दिलेल्या 133 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 115 धावात आटोपला.

भारताने पहिल्यादा फलंदाजी करताना जेमायमा रॉड्रीग्ज (26) आणि दिप्ती शर्मा (नाबाद 49) या दोघींच्या भागीदारीच्या जोरावर भारताने 20 षटकात 4 बाद 132 धावा केल्या. 133 धावांचा पाठलाग करताना हेली हिने अर्धशतक केले. पण पूनम यादवच्या फिरकीपुढे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी गुडघे टेकले. भारताकडून पूनम यादवने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर शिखा पांडेने 3 आणि राजेश्वरी गायकवाडने 1 गडी बाद केला.
हेली बाद झाल्यानंतर पुनमने पुढच्या षटकात ऑस्ट्रेलियाला सगल दोन धक्के दिले. राशेल हायनेस आणि इलीस पेरी यांना लागोपाठ दोन चेंडूवर बाद केले. तिला हॅट्ट्रिकची संधी होती, मात्र तनिया भाटियाने झेल सोडला. ऑस्ट्रेलियाची एक बाजू लावून धरणाऱ्या अॅलिसा हिलीशिवाय इतर फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत.

याआधी ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात टक्कर झाली होती. मात्र, अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे यजमान संघाकडून पराभव पत्करावा लागला होता.

You might also like