अल्पवयीन मुलींना पळवून परराज्यात विक्री करणारी टोळी सक्रिय

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन

एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्यानंतर तिची राजस्थानात विक्री केली आणि नंतर तिचे एका इसमाशी लग्न लावून दिल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कळमना पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याच प्रकारची घटना एप्रिल २०१८मध्ये अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. त्यावेळी पोलिसांनी नागपुरात अल्पवयीन मुलींना पळवून त्यांची परराज्यात विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता.

अजनी हद्दीत राहणाऱ्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला मध्यप्रदेशात १ लाख १५ हजारांत विकले होते. त्यानंतर विवाहापूर्वीच तिच्यावर दोन भावांनी बलात्कार केल्याचे उघडकीस आले होते. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या फिर्यादीची १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी २६ नोव्हेंबर २०१८ रोजी अचानक बेपत्ता झाली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली होती. पोलिसांनी प्राथमिक चौकशीअंती आरोपी सोनाली प्रल्हाद शाहू (२६) व स्वप्नील नरेंद्र नंदेश्वर (२८, दोन्ही रा. चिखली वस्ती नागपूर) यांनी संगनमत करून तिला फुस लावून पळवून नेऊन तिची राजस्थानात विक्री केल्याचे आणि नंतर लग्न लावून दिल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध कलम ३६३, ३६६, ३७० भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे. ही संपूर्ण घटना २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०१८ च्या दरम्यान घडली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून अल्पवयीन मुलीच्या शोधासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

उल्लेखनीय म्हणजे, नागपुरातील अजनी पोलीस ठाण्यांतर्गत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची लग्नासाठी मध्यप्रदेशात नेऊन विक्री केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मध्यप्रदेश आणि राजस्थानातील घटस्फोटीत पुरुषांनी विदर्भातील अशिक्षितांना टार्गेट बनविल्याचे भयानक वास्तव पुढे आले. यासाठी घटस्फोटितांकडून लाखो रुपये घेण्यात येत असून त्यांच्यासाठी विदर्भात दलाल सक्रिय असल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेच्या मुळाशी मध्यप्रदेश आणि राजस्थानातील घटस्फोटितांची वाढती संख्या जबाबदार मानण्यात येत आहे. लग्नानंतर कोणत्या ना कोणत्या कारणांनी पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर हे घटस्फोटीत पुरुष महिलांच्या किंवा मुलींच्या शोधात फिरतात. यात सर्वाधिक पुरुष त्यांच्या वैवाहिक जीवनात एकापेक्षा जास्त महिलांशी संबंध ठेवत असल्याने त्यांच्यात कौटुंबिक वादाची ठिणगी पडू लागली आहे. आता या पुरुषांनी विदर्भात येऊन अशिक्षित समाजाला टार्गेट केले आहे. ही बाब लक्षात घेऊन काही विघ्नसंतोषी लोकांनी यात दलालाची भूमिका पार पाडणे सुरू केले आहे. हे दलाल या घटस्फोटीत पुरुषांसाठी मुली विकण्याचे आणि त्या माध्यमातून रग्गड पैसा कमवीत असल्याचे या घटनेतून समोर येत आहे. त्याचबरोबर मुलींवर लक्ष ठेवून, त्यांच्याशी जवळीक साधून मुलीला फुस लावून पळविणाऱ्या महिलाही सक्रिय झाल्या आहेत.