आदित्य ठाकरे, आदिती तटकरेंसह पहिल्यांदाच निवडून आले ‘हे’ 5 युवक, बनले मंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र विकास आघाडीचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार नुकताच झाला. या मंत्रिमंडळात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 36 मंत्र्यांनी शपथ घेतली. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात 26 कॅबिनेट तर 10 राज्यमंत्र्यांनी गोपनियतेची शपथ घेतली. मात्र, अद्याप त्यांना खातेवाटप करण्यात आले नाही. आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात पहिल्यांदाच मंत्री झालेले आणि मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या तरुण आमदारांचा समावेश आहे.

1. आदित्य ठाकरे

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदित्य ठाकरे हे चिरंजीव आहेत. ठाकरे घराण्यात आत्तापर्यंत कोणत्याही व्यक्तीने निवडणूक लढवली नाही. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्या ठाकरे यांनी पहिल्यांदा वरळी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवली. आदित्य निवडणूक लढवणारे आणि पहिल्यांदा आमदार होणारे पहिले ठाकरे आहेत. आदित्य ठाकरे यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच पिता-पुत्र मंत्रिमंडळात असल्याची पहिली वेळ आहे.

2. आदिती तटकरे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आदिती तटकरे या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. आणि त्यांनी मंत्रिपदाची शपथ देखील घेतली आहे. आदिती तटकरे या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. राष्ट्रवादी युवती संघटनेच्या माध्यमातून त्यांनी पक्षसंघटनेत काम केले आहे. 2017 पासू त्यांनी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.

3. प्राजक्त तनपुरे

राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे राहुरी विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. प्राजक्त तनपुरे हे विद्यमान नगराध्यक्ष असून जनतेतून निवडून आलेले राहुरीचे पहिले नगराध्यक्ष आहेत. तनपुरे यांच वडील प्रसाद तनपुरे हे पंचेवीस वर्षे आमदार व एकदा खासदार राहिलेले आहेत. तर आई डॉ. उषा तनपुरे या नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत. प्राजक्त हे उच्चविद्याविभूषित असून ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहेत. ही पदवी त्यांनी पुणे येथून मिळवली आहे. एम ई ही पदव्युत्तर पदवी अमेरिकेमधून त्यांनी घेतली आहे. ते पहिल्यांदाच निवडून आले असून त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे.

4. शंकरराव गडाख

शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे आमदार शंकरराव गडाख हे नेवासा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव केला आहे. गडाख यांच्यारुपाने नेवासा विधानसभा मतदारसंघाला प्रथमच मंत्रीपदाची संधी मिळाली आहे.

5. राजेंद्र पाटील यड्रावकर

कोल्हापूरमधील शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. त्यानंतर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/