माझे तुकडे केले तरी भाजपात जाणार नाही : काँग्रेस आमदार ; भाजप प्रवेशाच्या अफवेमुळे काँग्रेस आमदार त्रस्त

गुजरात : वृत्तसंस्था – भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या उठलेल्या अफवांमुळे परेशान झालेले काँग्रेसचे आमदार विक्रम मादाम म्हणाले की, जरी माझे ३६ तुकडे केले तरी मी भाजपात प्रवेश करणार नाही. दरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी आणि आमदारांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे आणि म्हंटले की काँग्रेस पक्ष एकजूट आहे व काँग्रेस आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याचा कसलाही विचार करत नाहीत.

भाजपला लोकसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाल्यानंतर भाजपमध्ये इनकमिंग चालू झालं आहे. त्यामुळे पक्षांतरासंबंधीच्या अफवांना उधाण आले आहे. गुजरातमधील काँग्रेस आमदार फुटण्याच्या मार्गावर असल्याच्या बातम्या देखील पसरवल्या जात आहेत. काँग्रेसचे बंडखोर आमदार आणि नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते अल्पेश ठाकूर यांनी काँग्रेस आमदार फुटणार असल्याची शंका व्यक्त केली आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष जीतू वाघानी यांनी देखील अशीच शंका व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. गुजरातमधील २६ लोकसभेच्या जागेपैकी एकाही जागेवर काँग्रेसला यश मिळू शकले नाही. यांमुळे काँग्रेसचे नेते भारतीय जनता पक्षात प्रवेश करू शकतात, १० पेक्षा जास्त काँग्रेस आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारी आहेत अशा अफवा उडाल्या आहेत.