‘शहाण्याला शब्दांचा मार पुरेसा असतो’, शरद पवारांनी घेतला राज्यपालांचा ‘समाचार’ !

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मंदिर उडघण्यासंदर्भात खरमरीत शब्दात पत्र लिहणाऱ्या राज्यापाल भगत सिंह कोश्यारी यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोजक्या शब्दात समाचार घेतला आहे. राज्यपाल पदाची एक प्रतिष्ठा असते. ती राखायला हवी. शहाण्याला शब्दांचा मार पुरेसा असतो असं म्हणत पवारांनी राज्यपालांवर टीकास्त्र सोडलं आहे. उस्मानाबादमध्ये ते पत्रकारांसोबत बोलत होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीदेखील त्या पत्रावरून कोश्यारींवर नाराजी व्यक्त केली होती. आता शहांच्या विधानाचा संदर्भ देत पवारांनी कोश्यारींवर जोरदार टीका केली आहे.

शरद पवार म्हणाले की, “राज्यपाल पदाची एक प्रतिष्ठा असते. ती राखायला हवी. परंतु त्या पदावरील व्यक्तीनं प्रतिष्ठा राखायचीच नाही असं ठरवलं असेल तर आम्ही काय करणार” असं पवारांनी म्हटलं आहे.

शरद पवार पुढे म्हणाले, “राज्यपालांनी वापरलेल्या भाषेवर सर्वच स्तरातून टीका झाली. इतक्या टीकेनंतर आत्मसन्मान असलेली व्यक्ती त्या पदावर राहणार नाही. पण आपल्या पदाची प्रतिष्ठा जपायचीच नाही असं एखाद्यां ठरवलंच असेल तर काय करणार ? मराठीत एक म्हण आहे शहाण्याला शब्दांचा मार पुरेसा असतो” असा टोलाही पवारांनी लगावला आहे.

राज्यात बार, रेस्टॉरंट सुरू झाली आहेत मग प्रार्थनास्थळं बंद का ? मंदिरं बंद ठेवण्याचे दैवी संकेत आपणास मिळत आहेत का ? की तुम्ही अचानक सेक्युलर झाला आहात ? असा सवाल राज्यपालांनी मुख्यमत्र्यांना पत्रातून विचारला होता.

HM अमित शहा राज्यपालांवर नाराज

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या पत्रावरून नाराजी व्यक्त केली होती. शहा म्हणाले, “राज्यपाल कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र मी वाचलं. त्यांनी भाषणात काही संदर्भ दिले. परंतु त्यांनी काही शब्दांची निवड केली नसती तर बरं झालं असतं असं मलाही वाटतं. राज्यपालांनी ते विशेष शब्द वापरायला नको होते. त्या शब्दांची निवड त्यांनी टाळयला हवी होती.” असंही ते म्हणाले होते.