WFH मध्ये नेहमी असं वाटतं की आपण झोपेत काम करत आहोत, मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना महामारीमुळे जगभरात लॉकडाऊन लागू केले होते त्यामुळे प्रत्येकजण घरुन काम करत होते. अजूनही अनेक लोक ऑफिसचे काम घरुनच करतात. ज्याला वर्क फ्रॉम होम म्हणतात. जर आपण वर्क फ्रॉम होम (WFH) करताना बर्‍याच समस्यांना तोंड देत असाल तर आपण या प्रकरणात एकटे नाही. जगातील सॉफ्टवेअर दिग्गज मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यामुळे चिंतेत आहेत. ते म्हणाले की, अनेकदा वर्क फ्रॉम होममुळे असे वाटते की, आपण झोपेत काम करत आहोत.

तथापि, भारतात वर्क फ्रॉम होमची लोकप्रियता कमी होत नाही. बहुराष्ट्रीय कंपनी कोका कोलाशी संबंधित असलेल्या हिंदुस्तान कोका-कोलाने आपल्या विभागातील काही कर्मचार्‍यांना घरातून कायमचे काम करण्याची परवानगी दिली आहे.

काय म्हणाले नडेला
मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला हेही गेल्या कित्येक महिन्यांपासून वर्क फ्रॉम होम करत होते. वॉल स्ट्रीट जर्नलच्या सीईओ कौन्सिलमध्ये नडेला म्हणाले की, ऑनलाईन मीटिंग्जमुळे कर्मचारी खूप कंटाळले आहेत आणि त्यांना काम आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये ताळमेळ करणे कठीण जात आहे. ब्लूमबर्गच्या मते ते म्हणाले, ‘जेव्हा तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असता तेव्हा असे वाटते की, तुम्ही काम करत असताना झोपलेले आहात.’

ते म्हणाले की, वर्चुअल बैठक विशेषतः हानिकारक आहे. अर्ध्या तासाच्या व्हिडिओ मीटिंगमध्ये ती व्यक्ती खूप थकली जाते कारण त्यासाठी एकाग्रतेची आवश्यकता असते.

हिंदुस्तान कोका कोलामध्ये कायमचे WFH
भारतातील कंपन्यांना असे वाटते की, घरून काम करणे चांगले आहे. कोका कोला समूहाची कंपनी हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसने आपल्या कर्मचार्‍यांना वर्क फ्रॉम होमसाठी पर्याय निवडण्याची सुविधा दिली आहे. साहजिकच हे त्याच कर्मचार्‍यांसाठी असेल जे कार्यालयात काम करत होते. विक्री किंवा उत्पादनात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांसाठी हा पर्याय होणार नाही.

यासाठी कंपनीने कर्मचार्‍यांना अतिरिक्त आर्थिक मदतीची ऑफरही दिली आहे. उदाहरणार्थ, त्यांना इंटरनेट खर्च, आवश्यक आयटी पायाभूत सुविधा पुरविल्या जातील.