‘वर्क फ्राॅम होम’ला मिळतेय पसंती ! वाहतूककोंडी, ध्वनी-वायू प्रदूषण टाळण्यास होतेय मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूने जगभर थैमान घातल्यानंतर मागिल तीन महिन्यापूर्वी देशभर लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे रस्त्यावर वाहन नसल्याने वाहतूककोंडी, वायू-ध्वनीप्रदूषण नाही, पोलिसांच्या कटकटकी नाहीत. वर्क फ्रॉम होम असल्याने प्रवासाचा वेळ आणि मनस्ताप वाचला आहे. बदल अपेक्षित आहे, तो स्वीकारून पुढील वाटचाल करण्याची गरज निर्माण झाल्याची भावना संगणकावर काम करणाऱ्यांनी व्यक्त केली.

देशातील सर्वाधिक शहरीकरण झालेल्या आणि संगणकाधारित उद्योगांमध्ये स्थिरावलेल्या शहरांतील नोकरदारांनी आपसात केलेल्या संवादावरून स्पष्ट होत आहे. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, पुणे, अहमदाबाद, बंगळुरू, हैदराबाद, जयपूर आणि सुरत या शहरांमध्ये संगणकाधारित काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्यामध्ये आपापसात चॅटिंग होते. त्यामध्ये प्रवास, ड्रायव्हिंग अशा एक ना अनेक कटकटीमधून सुटका होत असल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन संपल्यावरही घरून काम करायला आवडेल, असे या नोकरदारांनी म्हटले आहे.

कामाची जागा आणि निवासस्थान यातील अंतर, स्वत:चे वाहन असल्यास ड्रायव्हिंगचा ताण, प्रचंड वाहतूक कोंडीचा ताण, प्रदूषण (ध्वनी आणि हवा) हे सहन करताना वाया जाणारी ऊर्जा आणि वेळ, मनस्ताप हे मुद्दे प्रामुख्याने दिसतात. मागिल तीन महिन्यांच्या काळात घरूनच काम केल्याने कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि कामात झालेली गुणात्मक वाढ उल्लेखनीय असल्याची चर्चाही त्यांच्यामध्ये दिसून येत आहे.

वाहन व्यवस्थेचा खर्च वाचला

शहरी नोकरदारांनी मांडलेला दुसरा मुद्दाही विचारात घेण्यासारखा आहे. तो म्हणजे, रोज कार्यालयात पोचण्यासाठी अनेक कंपन्यांना वाहन व्यवस्था करावी लागते. त्या व्यवस्थेत मोठी गुंतवणूक करावी लागते. मागिल तीन महिन्यांपासून कंपन्यांचा हा खर्च वाचला आहे. यापुढेही वर्क फ्रॉम होमला परवानगी मिळाल्यास कंपन्यांचा हा मोठा खर्च वाचल्याच दिसत आहे. काही नोकरदारांनी यापुढे सार्वजनिक वाहन व्यवस्था तसेच शक्य तिथपर्यंत पायी प्रवास करण्याचे ठरवले असल्याचा उल्लेख केला आहे. कंपन्यांनी बिझनेस ट्रॅव्हलवर मर्यादा आणाव्यात, असेही सुचवण्यात आले आहे.

नेटवर्क सेवेचा आजही अभाव

मात्र, नेटवर्क नियमित न मिळणे ही मोठी डोकेदुखी ठरत आहे. नेटवर्क सेवा पुरवठादारांचा बाजार देशभर जोमाने पसरलेला असला तरी खात्रीने अखंडित सेवा देण्याची किमया कोणत्याही कंपनीला जमलेले नाही. या समस्येमुळे काम करणाऱ्याच्या कार्यक्षमतेवरही अकारण बोट ठेवले जाऊ शकते. घरातील इतर सदस्यांचे दैनंदिन कामकाज हे गरजेचेच असते. ते थांबवता येत नाही. या घरगुती कामांमुळे कार्यालयीन कामात अडथळा निर्माण होऊ शकतो. विनाखंडित कामाची येथे कायमच अपेक्षा असते.

वेळेचे बंधन राहत नाही

दरम्यान, वेळेत कामाला सुरूवात झाली तरी घरुनच काम असल्याने उशिरापर्यंत  काम केले जाते. परिणामी विविध शारीरिक व्याधींना निमंत्रण मिळते. शिवाय अतिरिक्त कामाचा मोबदलाही मिळण्याची शक्यता धूसर असते. तरीसुद्धा कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याचे फायदेच अधिक खुणावतात. म्हणून त्याचा सर्रास स्वीकार केला जात आहे. शिवाय संगणकामुळे विजेचा अतिरिक्त वापर होवून वाढते विजबील तसेच मुलभूत गोष्टींचा जसेकी संगणक/ लॅपटॉप, प्रिंटर याची खरेदी किंवा दुरूस्ती, वायफाय/ नेटजोडणी, संगणक वापरापुरते फर्निचर याचा खर्च बऱ्याचदा कर्मचाऱ्यांना सोसावा लागतो.

परिवाराचा सहवास जास्त वेळ लाभत आहे. घरकाम व ऑफिस दोघं मॅनेज करतांना थोड सोपं झालंय. लांब प्रवासाची वेळ वाचते आहे. टाइम लिमीट संपून गेलय. कधीकधी रात्री 8-9 वाजेपर्यंत मिटींग सुरू असते. सुट्टीचे वार जवळ पास संपल्यात जमा आहे.

– प्रेरणा भंडारी, सी.ए.