देशात बंधुभाव, एकता आणि सलोखा जपण्याचे काम करणे गरजेचे : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

देशात राजस्थानमध्ये सर्वाधिक वीरपत्नी असून त्यांची संख्या 1100 इतकी आहे. सैनिक हे आपल्या देशाची शान असून त्यांच्या बलिदानाचे स्मरण करणे आपले कर्तव्य आहे.तसेच देशात बंधुभाव एकता आणि सलोखा जपण्याचे काम करणे गरजेचे आहे,असे मत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले.

दिवा प्रतिष्ठान आणि वीर हनुमान मित्र मंडळ यांच्यावतीने प्रदान करण्यात येणारा ‘यशोदा’ पुरस्कार परमवीर चक्र विजेते कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार शहीद अब्दूल हमीद यांच्या वीरपत्नी रसुलन बीबीजी यांना प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी माजी आमदार उल्हास पवार, माजी महापौर अंकुश काकडे, डॉ.रामचंद्र देखणे, इस्मालिक अभ्यासक अनिसजी चिश्ती, मयुर जाधव, ब्रिगेडीयर प्रसाद जोशी, अँड.प्रताप परदेशी उपस्थित होते. 5 लाख रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल असे या पुरस्काराचे स्वरुप होते.

यावेळी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील म्हणाल्या की, सीमेवर शत्रुशी लढताना पतीला आलेले मरण याचे दु:ख केवळ त्याच्या पत्नीला कळते. त्या शहिदांच्या मृत्युनंतर देखील तिचा जगण्यासाठीची तिची धडपड सुरु असते. समाजातील विविध चालीरीतींना तोंड द्यावे लागते. हे लक्षात समाजातील प्रत्येक व्यक्तीने जवानांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

परमवीर चक्र विजेते शहीद अब्दूल हमीद यांच्या पत्नी रसुलन बीबी म्हणाल्या की,हमार इतना सन्मान मिला अच्छा लगा.बहुत धन्यवाद. पती जाने के बाद हिंदुस्थान ने बडी इज्जत दी. आज पूना आने के बात आपने जो प्यार दिया आपका बहुत शुक्रिया. अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.

यावेळी प्रास्तविक करताना माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक दीपक मानकर म्हणाले की,यंदा यशोदा पुरस्काराचे तिसरे वर्ष असून या माध्यमातून रसुलन बीबींना गौरवताना विशेष आंनद होत आहे.त्यांचा संघर्ष पाहता समाजातील प्रत्येकाने त्यांच्याकडून आदर्श घेण्याची गरज असल्याचे त्यांनी आवाहन यावेळी केले.