लॉकडाउनमुळे बंद झालेले महा मेट्रोचे काम आता पुन्हा सुरू ! वाहतुकीत शनिवारपासून बदल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवाजीनगर एस टी स्थानकात मेट्रो स्टेशन येथील कामानिमित्त येथील वाहतुकीत शनिवारपासून बदल केला आहे. स. गो. बर्वे चौकातून न. ता. वाडी कडे जाण्यासाठी वाहनचालकांना कृषी महाविद्यालयाकडून साखर संकुलमार्गे जावे लागणार आहे. हा वाहतूक बदल पुढील आदेशा पर्यंत असणार आहे.

लॉकडाउनमुळे बंद झालेले महा मेट्रोचे काम आता पुन्हा सुरू झाले आहे. कर्मचारी उपलब्धतेनुसार काम सुरू केले आहे. महा मेट्रोकडून आता शिवाजीनगर येथील मेट्रो स्टेशनचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे शिवाजी रस्त्याने येवून स. गो. बर्वे चौकातून एस टी स्थानक, न. ता. वाडी, इराणी वस्ती, रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहनांना आता बंदी असणार आहे.

त्यामुळे या भागात जावू इच्छिणाऱ्या वाहन चालकांना सिमला ऑफिस येथून उजवीकडे वळून कृषी महाविद्यालयाजवळील चौकातून कृषी भवन, साखर संकुल या मार्गे न. ता. वाडी आणि अन्य ठिकाणी जाता येणार आहे. किंवा कृषी महाविद्यालय येथून वळसा मारून हॉटेल प्राइड समोरील बोळातून दळवी रुग्णालयाकडे जाता येईल.