शासन निर्णयाविरोधात कोतवाल संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शासनाने कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना चतुर्थश्रेणीचा दर्जा देण्याऐवजी मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला होता. शासनाच्या त्या निर्णयाचा निषेध म्हणून राज्यभरात आंदोलन सुरु आहेत. दरम्यान पुणे जिल्हा महसून कर्मचारी कोतवाल संघटनेच्या वतीने पुणे जिल्ह्यात काम बंद आंदोलन करण्यात येत आहे.

कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना चतुर्थश्रेणीचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी गेली ५० वर्षात अनेक आंदोलने करण्यात आली आहेत.त्याच अनुषंगाने संपूर्ण राज्यात संवर्गाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलने करण्यात येत आहेत. याचदरम्यान शासनाने कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना चतुर्थश्रेणीचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी २६ डिसेंबर २०१८ रोजी एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर, याचमागणीसाठी ७ जानेवारी २०१९ पासून पुणे जिल्ह्यात काम बंद आंदोलन करण्यात आले आहे.

दरम्यान कोतवालांच्या या आंदोलनानंतर शासनाने कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना चतुर्थश्रेणीचा दर्जा देण्याऐवजी मानधन वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यांचे मानधन ५०१० रुपयांवरून ७५०० रुपये करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दरम्यान शासनाच्या या निर्णयाचा निषेध म्हणून पुणे जिल्हा महसून कर्मचारी कोतवाल संघटनेच्या वतीने पुणे जिल्ह्यात काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. तसेच कोतवाल संघटनेच्या विविध मागण्यांसाठी आपले बेमुदत काम बंद आंदोलन असेच सुरू ठेवण्यात येणार असून,आंदोलनाच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर शासनाचा निषेध करण्यात येणार आहे. असे निवेदन देण्यात आले आहे.

काय आहेत मागण्या ?

कोतवालांना चतुर्थश्रेणीचा दर्जा देण्याचा निर्णय तातडीने घेण्यात यावा.

पात्र कोतवाल कर्मचाऱ्यांना ज्येष्ठतेनुसार शिपाई संवर्गात पदोन्‍नती देण्यात यावी.

कोतवाल कर्मचार्‍यांचे शोषण थांबविणे.

तलाठी कार्यालयातील खासगी मदतनीस तात्काळ काढून टाकण्यात यावे.

कोतवालांना वेळोवेळी तहसील कार्यालयात तसेच इतर वरिष्ठ कार्यालयात बोलविण्यात येऊ नये.

शासन स्तरावर योग्य तो अहवाल पाठविण्यात यावा.

यावेळी, प्रवीण घुले, नामदेव शिंद, संतोष कुटे, सचिन घोणे, गणपत भंडलकर, दशरथ सकट, सुनील चव्हाण, दिनकर जाधव, अण्णा शिंगाडे, रवी घुले, भाऊसाहेब जुदरे, मुरलीधर नवगिरे, संतोष खोमणे, तात्या जाधव, ताजुद्दीन शेख. शैलेश कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.