पाथरी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मनमानी

पाथरी : पोलीसनामा ऑनलाईन – पाथरी येथील तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मनमानी करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत आहेत. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने जिल्हाधिकारी पी.शिवा यांनी स्वत: जातीने लक्ष घालून सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे. दरम्यान, तहसील कार्यालयातील मनमानी कारभार करणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांवरही कठोर शासन करण्याचीही मागणी जोर धरत आहे. जनता आपल्या महसुली कामासाठी मैलोंनमैल प्रवास करुन पाथरी येथे येत असते. मात्र याठिकाणी आल्यानंतर तहसील कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांच्या मनमानी कारभाराला त्यांना सामोरे जावे लागत आहे.

पाथरी तहसील कार्यालयात एकही काम वेळेवर होत नाही, कुणाचा कुणाला मेळ नाही, उद्धट उत्तर, कर्मचारी या ना त्या कारणाने गैरहजर या समस्यामुळे कर्मचारी जनतेच्या सेवेसाठी आहेत की जनता कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी अशा संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून उमटत आहेत. ग्रामीण भागातील वृद्ध ग्रामस्थांना ऑफिसच्या बाहेर तासन्‌तास ताटकळत ठेवणे. हा तहसील कार्यालयाचा नित्याचा उपक्रम झाला आहे.

नागरिकांना उद्धट उत्तर देऊन अपमानित करणे हा तर कर्मचाऱ्यांचा नित्याचाच भाग झाला आहे. आपली कामे रखडवतील या भीतीने नागरिकसुद्धा निमुटपणे सहन करत आहेत. तर दिवस-दिवस बंद दरवाजाकडे पाहण्याची नामुष्की नागरिकांवर आली आहे.

सरकारी काम आणि सहा महिने थांब या म्हणी प्रमाणे पाथरी तहसील कार्यालयाचा अजब कारभार सुरू असून त्याबाबत विचारणा केल्यास कर्मचारी मुद्यापासुन पळ काढत आहे तहसिलदार भाग्यश्री देशमुख यांचा अंकुश या मुजोर कर्मचाऱ्यांवर अजिबात दिसून येत नाही. कर्मचारीच तहसिलदारांना जुमानत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी होत आहे.

आरोग्यविषयक वृत्त