क्रेनचे लोखंडी चॅनल पडून कामगार ठार, ठेकेदारासह इंजिनियरवर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – इमारतीचे बांधकाम सुरु असलेल्या प्रकल्पाच्या ठिकाणी चौथ्या मजल्यावर काम करणाऱ्या कामगाराच्या अंगावर क्रेनचे लोखंडी चॅनल पडून तो ठार झाला. ही घटना पुणे स्टेशन येथे सुरु असलेल्या ब्रम्हा बुलेवार्ड कन्स्ट्रक्शन साईटवर शनिवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास घडला.याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी कन्स्ट्रक्शन साईटच्या सेफ्टी सुपरवायजर, ठेकेदार आणि इंजिनियर वर गुन्हा दाखल केला आहे.

श्रवणकुमार देवीलाल दास (३२) असे मृत कामगाराचे नाव आहे. विष्णू लोणाग्रे, सुनील आणि संतोष धकाते अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गोपी सेसू शर्मा (वय ३४) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत कामगार श्रवणकुमार हा ब्रम्हा बुलेवार्ड कन्स्ट्रक्शन साईटवर काम करतो. तो शनिवारी सकाळी चौथ्या मजल्यावर काम करत होता. इमारातीच्या साहित्य उतरवण्यासाठी तेथे क्रेन उभी करण्यात आली आहे. दरम्यान तो काम करत असताना तेथे क्रेनचा लोखंडी चॅनल त्याच्या अंगावर पडले.

त्यात तो गंभीर जखमी होऊन मृत झाला. त्यानंतर याप्रकरणी गोपी शर्मा यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी सेफ्टी इंजिनियर, ठेकेदार आणि इंजिनियर यांच्याविरोधात हलगर्जीपणा केल्याप्रकऱणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.