छळ करणाऱ्या Boss ला शेवटच्या दिवशी दिलं ‘तिनं’ सडेतोड उत्तर; ‘ती’ चिठ्ठी झाली तुफान व्हायरल, जाणून घ्या काय आहे लेटरमध्ये

लंडन : वृत्त संस्था – सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. चांगली असो वा वाईट गोष्ट आपण ती अनेकदा शेअर करतोच. असाच प्रकार युनायटेड किंग्डममध्ये (UK) घडला. निवृत्त होणाऱ्या 64 वर्षीय महिला सफाई कर्मचाऱ्याने नोकरीदरम्यान छळ करणाऱ्या बॉसला चिठ्ठी लिहित सडेतोड उत्तर दिले आहे. तिचे हेच पत्र व्हायरल होत आहे.

ज्युली कॉसिन्स असे त्या महिलेचे नाव आहे. त्या युनायटेड किंग्डममधील साऊथहॅम्टन येथे राहत आहेत. त्या सेवानिवृत्त होत आहेत. मात्र, नोकरीदरम्यान त्यांना त्रास देणाऱ्या महिला बॉसकडून होणाऱ्या छळाबाबत त्यांनी अगदी बिनधास्तपणे उत्तर दिले. ज्युली कॉसिन्स या गेल्या 35 वर्षांपासून एका कंपनीमध्ये काम करत होत्या. त्यांनी वेगवेगळ्या बँकांमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम केले. ज्युली यांनी एचएसबीसी बँकेतील महिला मॅनेजरला चिठ्ठीमधून शाब्दिक टोला लगावला. ‘तुम्ही ज्या पद्धतीने कार्यालयामध्ये सर्वांसमोर माझा अपमान केला. त्यानंतर मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची यादी माझ्यानंतर येणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी तयार करुन ठेवली आहे’.

तसेच तुम्ही उगाच आक्रमक होत मला क्रूर वागणूक दिली. मात्र, त्यावरुन तुमचे व्यक्तिमत्व कसे आहे याची झलक पाहायला मिळाली. पण माझ्या व्यक्तिमत्वावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. त्यामुळे यापुढे तुम्ही सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की, या जगात तुम्हाला कसेही वागण्याचे स्वातंत्र्य असले तरी नम्रपणे वागा. कारण तुम्ही सर्वजण एखाद्या क्लिनरप्रमाणेच आहात, असे तिने चिठ्ठीत लिहिले.