पुण्यात कामासाठी आलेल्या तरुणाचा खाणित बुडून मृत्यू 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – पोहता येत नसल्याने बाजूला बसल्यानंतर पाय घसरून खाणीत पडल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मोशीत मंगळवारी दुपारी घडली.

नागेश गाडगी (25, रा. धावडे वस्ती, मोशी. मूळ रा. वजीर नगर, सोलापूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश मूळचा सोलापूर येथील असून तो बेरोजगार आहे. तो कामाच्या शोधात मोशी येथे राहणा-या आमीन सय्यद इनामदार या मित्राकडे आला होता. तो त्याच्या दोन मित्रांसोबत पोहण्यासाठी मोशी येथील खाणीमध्ये गेला. त्याला पोहता येत नसल्याने तो खाणीच्या कडेला बसून अंघोळ करत होता.

दरम्यान, त्याचे मित्र पोहत पोहत खाणीच्या दुस-या टोकाला गेले. त्यावेळी नागेशचा पाय घसरून तो पाण्यात पडला. मित्र दुस-या बाजूला असल्याने त्यांना नागेशपर्यंत पोहोचण्यासाठी उशीर झाला. तोपर्यंत नागेश पाण्यात बुडाला होता. त्याच्या मित्रांनी ही माहिती तात्काळ पोलिसांना दिली. अग्निशमन विभागाच्या जवानानी त्याचा शोध घेऊन बाहेर काढले. मात्र तो प्रयत्न त्याचा मृत्यु झाला होता. तपास एमआयडीसी पोलिस करत आहेत.