लोखंडी रस अंगावर पडून कामगाराचा मृत्यू

पेण : पोलीसनामा ऑनलाइन – पेण तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लोखंडातून टाकाऊ घटक बाजूला करत असताना गरम रस (स्लॅग) अंगावर पडून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पेण तालुक्यातील डोलवी गावच्या हद्दीत असणा-या जेएसडब्लू स्टील कंपनीतील एस.एम.एस प्लाँटमध्ये ही घटना घडली आहे. विश्वनाथ गावंड असं या कामगाराचं नाव आहे. दरम्यान या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी जेएसडब्ल्यु कंपनीचे दोन्ही गेट बंद केल्याने कंपनी परिसरात तणावाचे वातावरण तयार झाले.

कामगाराच्या मृत्यूची दुर्दैवी घटना आज (ता. २५) शुक्रवारी घडली. मुख्य म्हणजे नुकतेच मृत विश्वनाथ गावंड याचं लग्न झालं होतं.  विश्वनाथ गावंड हा बोरी गावात राहत होता. विश्वनाथ जेएसडब्ल्यु कंपनीत काम करत होता. परंतु अचानक त्याच्या अंगावर लोखंडी रस पडला आणि त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेची खबर मिळताच बोरी परिसरातील नागरिकांसह माजी अर्थ व बांधकाम सभापती संजय जांभळे, जि.प. सदस्य प्रभाकर म्हात्रे, प.स. सदस्य नरेश गावंड यांनी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली.  विश्वनाथ गावंड याच्या पश्चात आई, पत्नी, 2 भाऊ, 2 विवाहित बहिणी असा परिवार आहे असेही समजत आहे.

या घटनेनंतर तेथील ग्रामस्थांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिस उप अधीक्षक नितीन जाधव, वडखळ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजित शिंदे हे आपल्या सहका-यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडखळ पोलिस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.