Pune : कामगार पुतळा झोपडपट्टी पुनर्वसन : झोपडपट्टी मालकिचे पुरावे देण्याची मुदत 10 दिवसांनी वाढविली – उपायुक्त नितीन उदास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   मेट्रोच्या जंक्शनच्या कामासाठी कामगार पुतळा येथील तीन झोपडपट्टयांचे पुनर्वसन करण्याच्या प्रक्रियेला १० दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, झोपडी मालकीहक्काच्या नोंदणीसाठी महापालिकेने सुरू केलेल्या सर्वेक्षणामध्ये ७५ झोपडपट्टीधारकांनी अर्ज नेले असून आतापर्यंत ४२ झोपडीधारकांनी पुरावे सादर केले आहेत, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त नितीन उदास यांनी दिली.

शिवाजीनगर येथील कामगार पुतळा, राजीव गांधीनगर आणि तोफखाना झोपडपट्टीच्या जागेवर मेट्रोचे जंक्शन उभारण्यात येणार आहे. याजागेच्या भूसंपादनासाठी सर्वप्रथम येथील नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे.

या झोपडपट्टीच्या जागेवर मेट्रो स्टेशन होणार असल्याने एसआरएच्या वतीने यापुर्वीच येथील झोपडपट्टीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये ३१८ झोपडपट्टीधारकांनीच पात्रतेचे निकष पुर्ण केले आहे. यानंतर २९ जानेवारी २०२० ला येथील झोपडपट्टीवासियांना पुरावे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतू कोणीही पुरावे सादर केले नाहीत. मात्र, आता कृषि महाविद्यालय ते न्यायालयादरम्यानच्या बोगद्याचे काम पुर्ण झाले असून पुढील टप्प्यात भूमिगत मेट्रो स्टेशन ते स्वारगेट दरम्यानच्या भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

या पार्श्‍वभूमीवर या तिन्ही झोपडपट्टीतील नागरिकांना पुरावे सादर करण्याची संधी महापालिका प्रशासनाने दिली असून तिची मुदत आज संपत होती. या मोहीमेअंतर्गत आतापर्यंत ७५ झोपडपट्टीधारकांनी अर्ज नेले असून त्यापैकी ४२ नागरिकांनी पुराव्यासह अर्जही जमा केले आहेत. लॉकडाउनमुळे काही नागरिकांनी पुराव्यांसाठी आणखी अवधी मागितला आहे. त्यानुसार पुरावे सादर करण्यासाठीची मुदत दहा दिवसांनी वाढविली असल्याचे नितीन उदास यांनी सांगितले.

सन २००० पुर्वीच्या झोपडपट्टीधारकांचे लोहगाव येथील नवीन प्रकल्पांमध्ये पुनर्वसन करण्यात येणार आहे. मेट्रो प्रकल्प जाहिर होण्याच्या अर्थात २४ डिसेंबर २०१६ पुर्वीच्या झोपडयांचे एसआरएच्या संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे. पुनर्वसनाची व स्थलांतराची प्रक्रिया ऑनलाईन लॉटरी पद्धतीने केली जाणार आहे. नागरिकांनी डिसेंबर २०१६ पुर्वीच्या झोपडपट्टीचे पुरावे अर्थात स्वतंत्र झोपडी असल्याबाबतचे कागदपत्र, महापालिकेची सेवाशुल्क पावती, वीजबील, मतदार यादीमध्ये नाव असलेला पुरावा, निवडणूक ओळखपत्र पुढील दहा दिवसांत जमा करावे, असे आवाहनही उदास यांनी केले आहे.

You might also like