येवलेवाडीत इमारतीवरून पडून कामगाराचा मृत्यू , ठेकेदारावर गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – येवलेवाडी येथे बांधकाम प्रकल्पावर काम करत असताना डक्टमध्ये पडून कामगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी ठेकेदारावर निष्काळजी केल्याप्रकऱणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुपेंद्र साईबन्ना त्यागी (रा. अजमेरा पार्क, कोंढवा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. अनिल श्रीमंत बनसोडे (३५, रा. अप्पर बिबवेवाडी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर याप्रकऱणी पोलीस नाईक देवानंद विष्णू धोत्रे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवलेवाडी येथे अकिब मंजील या तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. त्या ठिकाणी अनिल बनसोडे हा कामगार काम करत होता. २३ फेब्रुवारी रोजी तो दुसऱ्या मजल्यावर मोकळ्या डक्टमधून तिसऱ्या मजल्यावर उभ्या असलेल्या शरणप्पा हंदगी याला लोखंडी सळई तो देत होता. त्यावेळी पाय घसरून तो खाली पडला आणि डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो मृत्यूमुखी पडला. त्यामुळे या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना न करता. निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केल्याप्रकऱणी ठेकादारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. व्ही. वाडकर करत आहेत.