पगार थकल्याने कामगारांनी पंकजा मुंडेंचा कारखाना पाडला बंद ?

परळी वैजनाथ : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या दीड वर्षापासून पगार थकल्याने आक्रमक झालेल्या कामगारांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना बुधवारी (दि. 10) सकाळी बंद पाडला. वजन काटा व सर्व कार्यालयाचे कर्मचारी, उत्पादन युनिटचे कर्मचारी या संपात सहभागी झाले होते.

दीड वर्षापासूून थकलेला पगार द्यावा याकरिता कामगारांनी दहा दिवसांपूर्वी कारखान्याचे कार्यकारी संचालक दिक्षतलू यांना निवेदन दिले होते. थकीत पगार 10 दिवसांत खात्यात वर्ग करा, अन्यथा आम्ही कारखाना बंद करु, असा इशारा दिला होता. दहा दिवस झाल्यानंतरही पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी कारखाना बंद केला.

दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांनी परळी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली आहे. सध्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या कारखान्याचे अध्यक्ष आहेत. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून कारखान्यातील कामगारांचे पगारच दिले नाहीत. हंगाम संपत आला तरी पगार मिळण्याची काही चिन्ह दिसत नसल्याने कामगार आक्रमक झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून व्यवस्थापनातील दोष, दुष्काळ यामुळे कारखाना अडचणीत आला आहे. मागील विधानसभा निवडणुकीपूर्वीही कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासाठी अनेक आंदोलन केले होते. दरम्यान दहा दिवसापूर्वीही कार्यकारी संचालकांना याबाबत निवेदन दिले होते. मात्र पगार झाला नसल्याने आक्रमक झालेल्या कामगारांनी अखेर आज कारखानाच बंद पाडला आहे.