1990 ते 2020 पर्यंत नोकरी करणार्‍यांना 1,20,000 रुपये देणार सरकार? जाणून घ्या सत्य

नवी दिल्ली : वृत्त संस्था – अशाप्रकारचे अनेक मेसेज सोशल मीडियावर पसरवले जातात, यापैकी बहुतांश बनावट असतात. यास बळी पडणार्‍यांचे मोठे नुकसान होऊ शकते. सध्या व्हॉट्सॲपवर एक मेसेज वायरल होत आहे. यामध्ये म्हटले आहे की, 1990 ते 2020 दरम्यान काम करणार्‍या कर्मचार्‍यांना सरकार मोठी रक्कम देणार आहे. भारत सरकारच्या लोगोसह वायरल होत असलेल्या या मेसेजमध्ये कामगार मंत्रालयाचे नाव घेऊन दावा करण्यात आला आहे की, अशा कर्मचार्‍यांना 1 लाख 20 हजार रुपये मिळवण्याचा अधिकार आहे. यासाठी त्यांना एका लिंकवर क्लिक करून लिस्टमध्ये आपले नाव शोधायचे आहे. लिस्टमध्ये नाव असेल तर ते लाभ घेऊ शकतात.

काय आहे वायरल मेसेजचे सत्य ?
सरकारी माहिती एजन्सी पीआयबी म्हणजेच प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोकडून ट्विट करून या वायरल मेसेजची सत्यता सांगण्यात आली आहे. पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, हा मेसेज पूर्णपणे बनावट आहे आणि मंत्रालयाकडून अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. लोकांनी अशाप्रकारचे फ्रॉड करणार्‍यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

‘बेरोजगारांना कमाईची संधी’च्या अफवेचे सत्य
काही आडठवड्यांपूर्वी बेरोजगारांना कमाईची संधी या टॅगद्वारे अफवा पसरवण्यात आली होती. मेसेजमध्ये तरूणांना दररोज 1000 ते 2000 रुपयांपर्यंत कमावण्याच्या नावावर फसवण्याचा प्रयत्न केला जात होता. याबाबत सरकारी एजन्सी पीआयबी म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोच्या फॅक्ट चेक टीमने सत्य सांगितले होते. भारत सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.