‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँक भारताला देणार 7500 कोटी रुपयांचे पॅकेज

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेने भारताला मोठा दिलासा दिला आहे. बँकेने सरकारी कार्यक्रमांसाठी अब्ज डॉलर (सुमारे 7,500 कोटी रुपये) पॅकेज जाहीर केले आहे. हे एक सामाजिक सुरक्षा पॅकेज आहे. तत्पूर्वी, ब्रिक्स देशांच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेने (एनडीबी) कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी भारताला एक अब्ज डॉलर्सची आपत्कालीन मदत जाहीर केली होती.

जागतिक बँकेचे संचालक जुनैद अहमद म्हणाले की, ‘सामाजिक अंतरामुळे अर्थव्यवस्था मंदावली आहे. भारत सरकारने गरीब व असुरक्षित लोकांच्या मदतीसाठी गरीब कल्याण योजनेवर लक्ष केंद्रित केले आहे. याद्वारे एक आरोग्य पुल बांधला जात असून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे काम केले जात आहे.’

जागतिक बँकेच्या निधीचा उपयोग देशातील कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या तपासणीसाठी, कोविड -19 रुग्णालयाच्या उन्नतीसाठी आणि प्रयोगशाळेच्या इमारतींसाठी केला जाऊ शकतो. बँकेने यापूर्वी 25 विकसनशील देशांना पॅकेज प्रस्तावित केले होते.

यासह, जागतिक बँकेने आपत्कालीन कोविड -19 प्रतिसादासाठी भारतात दिलेली रक्कम दोन अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली आहे. भारताच्या आरोग्य क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी मागील महिन्यात एक अब्ज अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर करण्यात आली होती.

आपत्कालीन सहाय्य रकमेची घोषणा करतांना एनडीबीने म्हटले आहे की, कोविड -19 चा भारतात प्रसार रोखण्यासाठी आणि कोरोना विषाणूच्या साथीने होणारे मानवी, सामाजिक व आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी हे कर्ज देण्यात येत आहे.

त्याचबरोबर, भारतातील कोरोनाची प्रकरणे सतत वाढत आहेत. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 81,970 वर पोचली आहे, त्यापैकी 51,401 सक्रिय आहेत, 27,920 लोक स्वस्थ झाले आहेत व त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे आणि 2649 लोक मरण पावले आहे.