world cancer day : बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना द्यावी लागली कॅन्सरशी खडतर झुंज 

मुंबई : वृत्तसंस्था – कर्करोग (कॅन्सर) कधी कोणाला होईल सांगता येत नाही. आज जगात अनेक असे लोक आहेत जे या आजाराशी झुंज देत आहे. काही जण या आजारावर यशस्वीपणे मात करतात तर काहीजण आयुष्याची लढाई हारतात. या कॅन्सरच्या विळख्यात अनेक सेलिब्रेटी सुद्धा सापडले होते. अभिनेत्री नर्गिस दत्त पासून ते आजच्या जमान्यातील अभिनेत्री सोनाली बेंद्रे पर्यंतचे अनेक सेलिब्रेटी कॅन्सरच्या विळख्यात सापडले होते. आजच्या ‘जागतिक कर्करोग दिना’ निमित्त अशा काही कलाकारांविषयी जाणून घेऊ या.

नर्गिस : ‘दर इंडिया’ अभिनेत्री नर्गिस दत्त यांना १९८० मध्ये पँक्रिअ‍ॅटिक कॅन्सरने पछाडलं होतं. न्यूयॉर्कमध्ये उपचारांनंतर त्या भारतात परतल्या. मात्र त्यांची प्रकृती खालावत गेल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.अखेर नर्गिस दत्त कोमात गेल्या. मुलगा संजय दत्तचं बॉलिवूड पदार्पण पाहण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

मुमताझ : राजेश खन्ना, दिलीप कुमार, शम्मी कपूरयांसारख्या अनेक सुपर स्टार सोबत काम करणाऱ्या साठच्या दशकातील आघाडीची अभिनेत्री मुमताझ यांना सुध्या वयाच्या ५४व्या वर्षी कॅन्सर झाला होता. साठच्या दशकात मुमताझ या आघाडीच्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या त्या आज कॅन्सरमुक्त आयुष्य जगत आहे.

राजेश खन्ना : बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांना २०११ मध्ये कॅन्सरचे निदान झाले होते. वर्षभरातच त्यांची कॅन्सरशी झुंज संपली. वयाच्या ६९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  राजेश खन्ना यांनी आराधना, अमरप्रेम, कटी पतंग, दो रास्ते, दुश्मन यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले होते.

मनिषा कोईराला : दिल से, मन, बॉम्बे यांसारख्या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री मनीषा कोईराला हिला देखील वयाच्या ४२व्या वर्षी कॅन्सर झाला होता. मनिषाला २०१२ मध्ये अंडाशयातील (ओव्हरियन) कॅन्सरचं निदान झालं होतं. काही शस्त्रक्रिया आणि केमोथेरपीनंतर तीन वर्षांनी मनिषाची कॅन्सर पासून सुटका झाली.

लिसा रे : वॉटर, बॉलिवूड हॉलिवूड, कसूर आणि अलीकडे वीरप्पन सारख्या चित्रपटात अभिनय करणारी अभिनेत्री लिसा रे हिला २००९ मध्ये कॅन्सर झाल्याचे समजले होते. तिला ‘मल्टिपल मायलोमा’ मध्ये बोन मॅरोमधील पांढऱ्या रक्तपेशींवर परिणाम होतो. हा अत्यंत दुर्धर कर्करोग मानला जातो. सेल ट्रान्सप्लांट केल्यानंतर २०१० मध्ये तिने आपण कॅन्सरमुक्त झाल्याचं जाहीर केलं.

आदेश श्रीवास्तव : संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचा वयाच्या ५१ व्या वर्षी कॅन्सरने बळी घेतला. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर अवघ्या ४० दिवसांत त्यांचे प्राण गेले. राजनीती, बॉर्डर, रेफ्युजी यांसारख्या चित्रपटाला त्यांनी संगीत दिले आहे.

अनुराग बसू : बर्फी, जग्गा जासूस यांसारखे चित्रपटाचे दिग्दर्शक अनुराग बसू यांनाही कर्करोगाचा सामना करावा लागला होता. २००४ मध्ये त्यांना ब्लड कॅन्सर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना फक्त तीन महिन्यांची मुदत दिली होती, मात्र सुदैवाने त्यांचा कर्करोगाशी लढा यशस्वी ठरला.

इरफान खान : बॉलिवूड मध्ये नाही तर अगदी हॉलिवूड चित्रपटामध्ये अभिनय करणारा आघाडीचा अभिनेता इरफान खानला मार्च २०१८ मध्ये आपल्याला न्यूरोएंडोक्राईन कॅन्सरने ग्रासल्याचं जाहीर केलं. या कॅन्सरची माहिती जेव्हा त्याच्या चाहत्यांना समजली तेव्हा सगळ्यांना धक्का बसला. सध्या तो लंडनमध्ये उपचार घेत आहे.

सोनाली बेंद्रे : बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला कॅन्सर झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ही बातमी कळताच बॉलिवूडसह तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. कॅन्सर झाल्यानंतर तिने एक भावुक पोस्ट शेअर केली होती. तसेच काही फोटो सुद्धा अनेक वेळा शेअर केले होते. सोनाली न्यूयॉर्कमध्ये उपचार घेऊन नुकतीच मायदेशी परतली आहे.

राकेश रोशन : काही महिन्यापूर्वी हृतिक रोशनने आपल्या वडिलांना म्हणजे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक राकेश रोशन यांना कॅन्सर झाल्याचे सांगितले होते. त्यांना प्राथमिक अवस्थेतील घशाचा कॅन्सर झाला होता. इन्स्टाग्रामवर भावपूर्ण पोस्ट टाकत हृतिकने वडिलांच्या आजारपणाविषयी माहिती दिली होती.

युवराज सिंग : या कॅन्सर झालेल्या सेलिब्रेटींच्या यादीत क्रिकेटर युवराज सिंग चे सुद्धा नाव आहे. २०११ च्या वर्ल्डकप नंतर युवराज आजारी पडला होता. त्याला पहिल्या स्टेजचा फुफ्फुसाचा कॅन्सर झाला होता. यानंतर तो अमेरिकेत उपचार घेण्यासाठी गेला होता. उपचार घेऊन परतल्यानंतर त्याने भारतीय संघात पुनरागमन केलं होत.

याशिवाय काही दिवसापूर्वी जेष्ठ अभिनेत्री नफिसा अली यांना सुद्धा कॅन्सर झाल्याचे समोर आले होते. त्यांनी खुद्द याची माहिती एका भावनिक पोस्ट द्वारे दिली  होती. तसेच सध्याचा आघाडीचा अभिनेता आयुष्मान खुराणा याची पत्नी ताहिरा कश्यप हिला पहिल्या टप्प्यातला कॅन्सर झाल्याचे समोर आले होते.