‘कोरोना’च्या रूग्णांवर उपचार करणार्‍या 9 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू, ‘ट्रीटमेंट’साठी लग्न पुढं ढकलणार्‍या 29 वर्षीय डॉक्टरचे आता गेले प्राण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस अजूनही चीनमध्ये ठाण मांडून बसला आहे. या आजारामुळे २ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून संक्रमित रुग्णांची संख्या जवळपास ७४ हजारांवर पोहोचली आहे. त्यात आता चीनमध्ये एका २९ वर्षीय तरुण डॉक्टरचा मृत्यू झाला ज्याने कोरोना व्हायरसच्या रूग्णांच्या उपचारासाठी आपला विवाह पुढे ढकलला होता. आतापर्यंत चीनमध्ये अशा ९ जणांचा मृत्यू झाला आहे, जे कोरोना विषाणूच्या रुग्णांची काळजी घेत होते.

चीनच्या आरोग्य ब्युरोच्या म्हणण्यानुसार, २९ वर्षीय डॉक्टर पेंग यिन्‍हुआ वुहान रुग्णालयात कोरोना विषाणूमुळे पीडित रूग्णांवर उपचार करत होते. यावेळी, त्याला देखील कोरोनाचा फटका बसला. पेंग एक रेसपाइरेटरी एक्‍यूट केयर चिकित्सक होते. त्यांना 25 जानेवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 30 जानेवारी रोजी त्यांना वुहानमधील दुसर्‍या रुग्णालयात संदर्भित करण्यात आले. मात्र, गुरुवारी रात्री त्यांचे निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूच्या वाढत्या रूग्णांवर उपचार करावयाचे होते म्हणूनच पेंगने त्यांचा विवाह पुढे ढकलला होता. डॉक्टरांचे म्हणणे आहे की आम्ही त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण आम्हाला त्यात यश आले नाही. पेंग यांच्या निधनानंतर आता चिनी आरोग्य अधिका्यांनी आरोग्य एजन्सींना मृत्यू झालेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी शाहिद सन्मानासाठी अर्ज करण्यास सांगितले आहे. मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करणे आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यात मदत करणे हा त्याचा हेतू आहे. यापूर्वीही कोरोना विषाणूच्या रुग्णांवर उपचार करतांना चीनमधील काही लोक आपला जीव गमावला आहे.

दरम्यान, ली वेनलियांग हे कोरोना विषाणूबद्दल सरकारला इशारा देणारे चीनमधील पहिले डॉक्टर होते , परंतु त्यांच्या या बोलण्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. ७ फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले. ली यांनी ३० डिसेंबर रोजी याबद्दल पहिल्यांदा सांगितले होते. वुहानच्या ७ रुग्णांमध्ये कोरोना विषाणूची शक्यता त्यांनी व्यक्त केली होती.