नारळपाण्यापासून तर नारळाच्या तेलापर्यंत, जाणून घ्या ‘हे’ 16 आरोग्यदायी फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – स्वयंपाक घरात रोजच नारळाच्या खोबऱ्याचा वापर केला जातो. याचं पाणी अनेकांना आवडतं. आजारी माणसांना नारळ पाणी आवर्जून दिलं जातं. याशिवाय खोबरेल तेलाचाही रोजच्या जीवनात वापर केला जातो. आज नारळाचे, खोबऱ्याचे आणि तेलाचे आपण दैनंदिन जीवनातील आणि काही आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.

1) माडाचे किंवा नारळाचे सर्व भाग फायद्याचे असतात. पूर्वी अनेक गावात नारळाच्या झाडांच्या झावळ्या घरांचं छप्पर शाकारण्यासाठी वापरल्या जात होत्या.

2) दक्षिण भारतात अनेक ठिकाणी नारळाचे खोबरेल तेल काढण्याचा मोठा व्यवसाय आहे. या तेलात गंधयुक्त द्रव्य आणि आम्लता असते. परंतु आपल्या घरी नारळाचं खोबरे खवून, लोणी कढवून जसं तूप करतो असं नारिकेल तेल तयार केल्यास त्यात किंचितही आम्लता नसते. अशा ताज्या नारिकेल तेलात तुपाइतकेच अनेकानेक शरीरपोषक गुण असतात.

3) नारळापासून काढलेल्या तेलाचा उत्तम दर्जाचा साबण दक्षिणेत खूप लोकप्रिय आहे.

4) नारळाच्या कवटीपासून जाळून काढलेलं तेल अनेकानेक त्वचाविकारांवर उपयुक्त आहे. पूर्वी पुण्याच्या मंडईत पावगी नावाच्या महिला अशा तेलाची विक्री करत असत.

5) शहाळ्याचं पाणी सर्वांनाच आवडतं. हे पाणी थंड आणि खूप पौष्टीक असतं. यात एक वेगळचा गोडवा असतो. जर गरोदर महिलांनी रोज ओल्या नारळाचं खोबरं खाल्लं तर जन्माला येणारं बाळ हे गोरंपान आणि कांतीवान असतं असा सार्वत्रिक समज आहे.

6) नाराळाचा अंगरस खोकला, क्षय आणि अशक्तपणा दूर होण्यासाठी देतात. त्यानं बद्धकोष्ठता दूर होते.

7) दक्षिणेतील मलबार प्रदेशात नारळापासून अति चविष्ट गूळ बनवण्यात येतो.

8) ज्यांचे केस अकाली गेले आहेत त्यांनी घरी केलेलं नारिकेल तेल, पोटात घेण्यासाठी आणि केसांना लावण्यासाठी वापरलं तर महिना-दीड महिन्यात उत्तम केस येतात. टक्कल पडलेल्या अनेक मंडळींचा तसा अनुभव आहे.

9) घरगुती नारिकेल तेल कॉडलिव्हर ऑईलपेक्षा खूप चांगलं काम करतं. यासाठी क्षयी व्यक्तींनी ओलं खोबरं खावं आणि ताजं तेलंही प्यावं.

10) खूप अवघड शस्त्रक्रियेच्या आधी आणि नंतर कोवळ्या नारळाचं दूध प्यायला दिल्यास शस्त्रकर्म निर्विघ्न पार पडतं.

11) खूप श्रमाचं काम करणाऱ्या महिलांनी ओलं किंवा कोरडं खोबरं खाल्लं तर त्या आपली गमावलेली ताकद लगेच परत मिळवतात.

12) नारळाला कल्पवृक्ष म्हटलं जातं ते काही उगाच नाही. कारण ओला नारळ, सुकं खोबरं, नारळपाणी, नारळाचं दूध, नारळाचं तेल आणि तुप असं सारंच खूप उपयुक्त आहे. एवढंच नाही तर नारळाची शेंडी आणि करवंटीसुद्धा उपयोगाची आहे.

13) अंगाची आग होणं, विष्ठा किंवा थुंकीतून रक्त पडत असेल तर ओलं खोबरं काळा मनुका किंवा खडीसाखरेसोबत चघळून खावं.

14) गळ्यात खवखवून खोकला येत असेल किंवा तहानेनं घसा कोरडा पडला असेल तर ओला नारळ चावून खावा.

15) खोबरं हे बलवर्धक आहे. अशक्त माणसांनी खडीसाखरेसोबत याचं सेवन करावं. (त्यानं थोडा मलावरोध होतो. त्यामुळं औषधी उपयोग करताना काळ्या मनुक्यांसोबत त्याचं सेवन करावं.) पुरुषांमधील वंध्यत्वात शुक्राणूवृद्धीसाठी हा प्रयोग नक्की करून पहावा.

16) पचनाच्या तक्रारींसाठी रोजच्या जेवणात पुदीना, आलं, लसूण, कढीपत्ता, ओला नारळ, यांची चटणी आवश्य खावी. या चटणीत ओवा आणि सैंधव घातले असता वातामुळं शरीरात कुठेही कंप किंवा थरथरणं यानं कमी होतं.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.