World Cup 2019 : खेळपट्ट्यांपेक्षा कॅप्टन कोहलीला ‘या’ गोष्टीची अधिक चिंता

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ ची सुरूवात येत्या ३० मे पासून होत आहे. इंग्लंडमधील ११ शहरांत तब्बल ४८ सामने रंगणार आहेत. क्रिकेट प्रेमींसाठी हा क्रिकेटचा कुंभमेळाच आहे. जगातील सर्वोत्तम १० देशांचा समावेश असलेली हि स्पर्धा चार वर्षातून एकदा खेळवण्यात येते. त्यामुळे जगभरातील क्रिकेट रसिक याकडे डोळे लावून बसलेले असतात. या स्पर्धेसाठी भारतीय संघ उद्या इंग्लंडला रवाना होणार आहे. या स्पर्धेला रवाना होण्याआधी भारतीय कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भारत या स्पर्धेत विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.

यावेळी बोलताना विराट कोहली म्हणाला कि, भारतीय संघ समतोल आहे आणि याआधी देखील इंग्लंडमध्ये भारताने चांगली कामगिरी केली आहे. इंग्लंडमधील खेळपट्ट्यांवर आम्ही कशी कामगिरी करतो यापेक्षा तणाव कशाप्रकारे हाताळतो, हे महत्वाचे आहे. यावेळेस राऊंड रॉबिन फॉर्मेट पद्धतीने संघ एकमेकांशी भिडणार आहेत. या फॉरमॅटमध्ये प्रत्येक संघाला कमीत कमी एकदा अन्य ९ संघासोबत एकतरी सामना खेळायचा आहे. याचाच अर्थ प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहे. त्यामुळे सर्व संघांना यावेळी सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. या फॉर्मेटमुळे स्पर्धेतील चुरस वाढली आहे.

दरम्यान, प्रत्येक सामना हा संपूर्ण ताकदीनं आणि शंभर टक्के योगदान देऊन खेळण्याची गरज आहे आणि विजयाचाच विचार केला पाहिजे, असेदेखील यावेळी कोहली म्हणाला. भारत आपला पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेबरोबर खेळणार आहे.