ICC World Cup 2019 : विजेत्या संघाला मिळणार ‘एवढी’ रक्कम

लंडन : वृत्तसंस्था – विश्वकप २०१९ स्पर्धेला काल सुरुवात झाली. काल झालेल्या सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा १०४ धावांनी पराभव करून स्पर्धेची सुरुवात विजयाने केली. या स्पर्धेत एकूण १० संघानी सहभाग घेतला असून प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध ९ सामने खेळणार आहे. त्यानंतर गुणतालिकेत सर्वात वर असणारे ४ संघ सेमीफायनल मध्ये खेळातील.

क्रिकेटच्या या कुंभमेळ्यातील विजेतेपदाची रक्कम देखील तितकीच महत्वाची आहे जितकी या विजेतेपदाची ट्रॉफी. यामुळे या वर्षी हि स्पर्धा जिंकणारा संघ मालामाल होणार आहे. या स्पर्धेत विजेतेपदाची एकूण रक्कम हि ७० कोटी रुपये आहे. यात विजेत्या संघाला २८ कोटी रुपये मिळणार आहेत. तर उपविजेत्या संघाला १२ कोटी रुपये मिळणार आहेत. त्याचबरोबर उपांत्य फेरीत जाणाऱ्या संघाला देखील बक्षीस देण्यात येणार आहे.

उपांत्य सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला ८ लाख डॉलर, तर प्रत्येक साखळी सामन्यातील विजेत्या संघाला ४० हजार डॉलर प्रदान करण्यात येतील. साखळी सामन्यातून आगामी फेरीत दाखल होणाऱ्या संघाला एक लाख डॉलर देण्यात येतील. या वर्षी हि स्पर्धा राउंड रॉबिन पद्धतीने खेळवली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला यावेळी विजेतेपद मिळवण्याची संधी आहे. भारत आपला पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेबरोबर खेळेल. १४ जुलै रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल.
दरम्यान, या स्पर्धेत भारतीय संघाला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे, त्यामुळे भारतीय पाठीराखे आणि चाहत्यांची भारतीय संघाकडून खूप अपेक्षा आहेत.