वर्ल्ड कप २०१९ : पाकिस्तानसाठी ‘लकी’ फॉरमॅट, तर भारताचे काय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ ची सुरूवात येत्या ३० मे पासून होत आहे. इंग्लंडमधील ११ शहरांत तब्बल ४८ सामने रंगणार आहेत. क्रिकेट प्रेमींसाठी हा क्रिकेटचा कुंभमेळाच आहे. जगातील सर्वोत्तम १० देशांचा समावेश असलेली हि स्पर्धा चार वर्षातून एकदा खेळवण्यात येते. त्यामुळे जगभरातील क्रिकेट रसिक याकडे डोळे लावून बसलेले असतात. यावेळेस राऊंड रॉबिन फॉर्मेट पद्धतीने संघ एकमेकांशी भिडणार आहेत. या फॉरमॅटमध्ये प्रत्येक संघाला कमीत कमी एकदा अन्य ९ संघासोबत एकतरी सामना खेळायचा आहे. याचाच अर्थ प्रत्येक संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळणार आहे. त्यामुळे सर्व संघाना यावेळी सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे.

राऊंड रॉबिन फॉर्मेट पद्धतीत सर्व संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळतात आणि त्यानंतर गुणतालिकेत सर्वात वर असणारे चार संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतात. पहिला सामना ३० मे रोजी तर अखेरचा सामना १४ जुलै रोजी खेळवला जाणार आहे.

पाकिस्तानसाठी लकी फॉरमॅट
राऊंड रॉबिन फॉरमॅट वर्ल्ड कपमध्ये १९९२ साली पहिल्यांदा वापरण्यात आला होता. पाकिस्तानसाठी तो लकी ठरला होता. इम्रान खानच्या नेतृत्वात पाकिस्तानने १९९२ चा वर्ल्ड कप जिंकला होता. तर भारताला त्या वर्ल्ड कपमध्ये फक्त २ सामने जिंकता आले होते. आणि ६ सामन्यांत पराभव झाला होता. त्यामुळे भारताला यावेळी कंबर कसावी लागणार आहे.

क्रिकेट वर्ल्ड कप आत्तापर्यंत तीन फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आले आहेत. १९९९, २००३ आणि २००७ सालचा वर्ल्ड कप ग्रुप आणि सुपर-६ / सुपर-८ आणि नॉकआऊट फॉरमॅटमध्ये झाले. ४ वर्ल्ड कप ग्रुप आणि नॉकआऊट फॉरमॅटमध्ये खेळले गेले. त्यानंतर आता पुन्हा हा वर्ल्डकप राऊंड रॉबिन फॉर्मेट पद्धतीत खेळवला जाणार आहे.

त्यामुळे या स्पर्धेत भारत चांगली कामगिरी करतो कि हा फॉरमॅट लकी असलेला पाकिस्तान चांगली कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.