वर्ल्डकप २०१९ : भारताची चिंता वाढली ; ‘हा’ खेळाडू पुढील सामन्याला ‘मुकणार’ ?

लंडन :वृत्तसंस्था -आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली असून सगळेच संघ जिंकण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावत आहे. सगळ्याच संघाचे जवळपास दोन सामने झाले आहेत. त्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड गुणतालिकेत सध्या सर्वात वरच्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारताने शानदार ३६ धावांनी विजय मिळवत आपला दुसरा विजय साजरा केला. त्यानंतर आता भारत आपला पुढील सामना १३ जून रोजी न्यूझीलंडबरोबर तर १६ जून रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान बरोबर खेळणार आहे.

मात्र त्याआधी कर्णधार विराट कोहलीच्या चिंतेत भर पडली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात शानदार शतकी खेळी करणाऱ्या शिखर धवन याच्या उजव्या अंगठ्याला दुखापत झाली असून त्याचे स्कॅन करण्यात आले असून तो न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खेळणार कि नाही याबाबत सस्पेन्स कायम आहे. त्याच्या अंगठ्याला सूज आल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने क्षेत्ररक्षण देखील केले नव्हते. त्यामुळे आता गुरुवारी होणाऱ्या सामन्याआधी पुन्हा एकदा त्याची चाचणी करूनच तो या सामन्यात खेळू शकतो कि नाही हे ठरवणार आहेत.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने शानदार ११७ धावा करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. आयसीसीच्या स्पर्धांमधील धवनचे हे ६ वे शतक आहे तर,वर्ल्ड कपमधले तीसरे शतक आहे. त्याचबरोबर जर धवन या सामन्यात खेळू शकला नाही तर त्याच्या जागी विजय शंकर किंवा दिनेश कार्तिक यांना संधी दिली जाऊ शकते.