वर्ल्डकप २०१९ : सामना जिंकला तरी घडला नकोसा वाटणारा ‘हा’ विक्रम

कार्डिफ : वृत्तसंस्था – श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना श्रीलंकेने जिंकला असला तरी या सामन्यात श्रीलंकेला नकोसा वाटावा असा विक्रम झाला आहे. क्रिकेटच्या इतिहासातील हजारो एक दिवसीय सामन्यांपैकी केवळ सात डाव असे आहेत की त्यात मधल्या फळीतील फलंदाज केवळ ५ पेक्षा कमी धावात बाद झाले. त्यातील दोन डाव श्रीलंकेच्या नावावर आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचे चार, पाच, सहा आणि सातव्या क्रमांकाचे फलंदाज अनुक्रमे २, ०, ०, २ धावा काढून बाद झाले. म्हणजे मधल्या फळीचे योगदान फक्त चार धावांचे राहिले आणि लागोपाठ दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेची मधली फळी ढेपाळली. गेल्या सामन्यातही न्यूझीलंडविरुद्ध त्यांचे चार ते सात क्रमांकाचे फलंदाज अनुक्रमे ०, ४, ०, १ धावा काढून बाद झाले होते. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील हजारो सामन्यांपैकी केवळ ७ सामने असे आहेत, ज्यात मधल्या फळीच्या फलंदाजांनी पाचपेक्षाही कमी धावांचे योगदान दिले आहे. त्यापैकी दोन डाव श्रीलंकेचे आहेत.

अफगाणिस्तानविरुद्ध फलंदाजांनी ढिसाळ कामगिरी केल्याने संघाच्या चिंतेत भर पडल्याचे श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने म्हणाला. ‘श्रीलंकेला पुढचा मार्ग सोपा करायचा झाल्यास फलंदाजीत दमदार कामगिरी करावीच लागेल,’ असे माहेला म्हणाला. कार्डिफमध्ये २५० धावा सहज निघू शकल्या असत्या, असे नमूद करीत माहेला म्हणाला, ‘कुसाल परेराने धावा केल्या नसत्या, तर लंकेची अवस्था आणखी बिकट झाली असती. पुढील सामना पाकविरुद्ध असून या संघाविरुद्ध धावा काढण्यात अपयश यायला नको. लंकेच्या फलंदाजांनी आत्मविश्वासाच्या बळावर मोठी खेळी करावी.’

Loading...
You might also like