# World Cup 2019 : विंडीजने उडवला पाकचा धुव्वा

नॉटिंगहॅम : वृत्तसंस्था – वर्डकप मधील दुसऱ्या सामन्यात प्रथम गोलंदाजी स्वीकारलेल्या विंडीजने पाकच्या फलंदाजीचं धुव्वा उडवला. थॉमस आणि होल्डरने प्रत्येकी ४ आणि ३ विकेट घेत पाकला खिंडार पाडत पाकला १०५ धावात गुंडाळले. वर्ल्डकपमधील हा पाकिस्तानची दुसऱ्या क्रमांकाची सर्वात कमी धावसंख्या आहे. १९९२ च्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने पाकिस्तानला ७४ धावात ऑल आऊट केले होते.

कॉटरेलने इमाम उल हकला २ धावांवर बाद करत पहिला धक्का दिला. त्यानंतर आंद्रे रसेलने २२ धावा करुन तग धरू पाहण्यात फखर जमानला २२ धावांवर बाद करुन दुसऱ्या सलामीवीरही माघारी धाडला. त्यानंतर रसेलने हॅरिस सोहेललाही घरचा रस्ता दाखवत आपला दुसरा बळी टिपला. पहिल्या १० षटकात अवघ्या ४५ धावात पाकने तीन फलंदाज गमावले.

त्यानंतर क्रिजवर आलेल्या बाबर आझम आणि कर्णधार सर्फराज अहमदने पाकचा डाव सवरण्याचा प्रयत्न केला. पण, ओश्ने थॉमसने बाबर आझमला २२ धावांवर बाद करत पाकला मोठा धक्का दिला. बाबर बाद झाल्यानंतर पाकच्या फलंदाजीला चांगलीच गळती लागली. सर्फराज अहमद (८), इमाद वासिम (१), शादाब खान (०) यांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.

विंडीजच्या या फास्ट बॉलर्सनी नॉटिंगहॅमवर आणलेल्या वादळात पाकिस्तानची अवस्था १८ षटकात ८ बाद ८१ अशी झाली होती. मोहम्मद हाफिजने पाकला शंभरीपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला पण, थॉमसने त्याला १६ धावा करुन त्याच्या आशेवर पाणी फेरले. त्याचे हे काम वहाब रियाझने २ षटकार १ चौकार मारत पूर्ण केले. तरीही होल्डरच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तान १०५ धावात ढेर झाली. थॉमसने ४ तर होल्डरने ३ बळी टिपले.