पोलीसनामा ऑनलाइन टीम – जगप्रसिद्ध मेक्सिकोचा कुख्यात ड्रग माफिया अल चापो गूसमैनच्या पत्नी एम्मा कोरोनेलला अंमली पदार्थांच्या तस्करीच्या संशयातून अमेरिकेतील डलेस विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आहे. सोमवारी हि कारवाई करण्यात आली.
अमेरिकेच्या न्यायिक विभागाने सांगितले की, ३१ वर्षीय एम्मावर अमेरिकेत बेकायदा पद्धतीने एक किलोपेक्षा जास्त हेरॉईन, पाच किलो कोकेन आणि एक हजार किले गांजा व 500 ग्रॅम मेथामफेटामाईनची तस्करीचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तस्करी आणि पैशांची अफरातफरी प्रकरणात ड्रग तस्कर अल चापो हा न्यूयॉर्कमध्ये आजीवन जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. अल चापोला २०१९ मध्ये अटक करण्यात आल्यानंतर त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले. लहान मुलींनी ड्रग देणे, त्यांच्यासोबत अश्लिल प्रकार, लैंगिक शोषण करणे आणि कार्टेलच्या माजी सदस्यांची हत्या करणे आदी गुन्हयाची त्याने कबुली दिली होती.
अमेरिका आणि मेक्सिको देशांचे कोरोनेलकडे नागरिकत्व आहे. आज तिला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर केले जाणार आहे. अंमली पदार्थांच्या तस्करीसह कोरोनेलवर पतीला म्हणजेच अल चापोला २०१५ मध्ये तुरुंगातून पळविण्यासाठी मदत केल्याचाही आरोप लावण्यात आला आहे.
मेक्सिकोच्या सर्वाधिक सुरक्षित असलेल्या तुरुंगात अल चापोला ठेवण्यात आला आहे. दरम्यान, चापोच्या मुलाने त्याची सुटका करण्यासाठी तुरुंगाच्या बाजुलाच जमीन खरेदी केली होती. चापोकडे जीपीएस असलेले घड्याळ देण्यात आले होते. त्यामुळे तो जेलमध्ये कोणत्या भागात आहे याची माहिती चापोच्या मुलाला मिळत होती. त्यानुसार शेजारी खरेदी केलेल्या जमिनीतून तुरुंगापर्यंत सुरुंग खोदायला सुरुवात केली होती. परंतु, हा प्रयत्न निष्फळ ठरला होता. त्यानंतर आणखी एक प्लॅन तयार करण्यात आला होता. मात्र, जानेवारी २०१७ मध्ये अल चापोला अमेरिकेच्या स्वाधीन करण्यात आले आणि हा प्लॅन फसला.
कोण आहे अल चापो
अल चापो हा शेतकऱ्याचा मुलगा होता. त्याच्या घराच्या आजुबाजुला अफीमची शेती होत होती, त्यामुळे लहानपणापासूनच त्याला तस्करीचे धडे मिळाले. मिगेल अँजेल फेलिक्स गालार्दोला त्याने गॉडफादर बनविले. त्याच्याकडूनच सारे शिकत चापो हा १९८० मध्ये मेक्सिकोच्या सर्वात शक्तिवान अशा सिनालोआ ड्रग्सची तस्करी करणाऱ्या टोळीचा मुखिया बनला. यानंतर अमेरिकेतही अल चापोने सर्वाधिक ड्रग पुरवठा करण्यास सुरुवात केली. २००७ मध्ये अल चापो आणि एम्मा कोरोनेल यांनी लग्न केले होते.