कुठंय जगातील पहिली ‘कोरोना’ विषाणूची रुग्ण ? एक वर्षानंतरही नाही आली समोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   चीनची महिला वैज्ञानिक ज्यांना जगातील पहिली कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण म्हणून ओळखले जात होते, त्या या साथीच्या एका वर्षानंतर देखील बेपत्ता आहेत आणि बरीच तपासणी व दबावानंतरही चीन या महिलेचा खुलासा करण्यात अपयशी ठरले आहे. व्हायरस तज्ञ हुआंग येनलिंग यांचे नाव सर्वात पहिल्यांदा फेब्रुवारी 2020 मध्ये चर्चेत आले होते.

वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे एक संशोधक म्हणून काम करणाऱ्या हुआंग येनलिंग यांचे वर्णन जगातील पहिली कोरोना व्हायरस रुग्ण म्हणून केले गेले होते. फेब्रुवारी 2020 मध्ये हुआंगला बर्‍याच ऑनलाईन अहवालांमध्ये ‘पेशंट झिरो’ असे म्हटले गेले होते, ही वेळ अशी होती जेव्हा व्हायरसने चीनमध्ये हाहाकार माजवला होता. असा दावा केला जात आहे की कोरोना विषाणूची अधिकृत माहिती उघड होण्यापूर्वीच ही महिला कोरोना पॉझिटिव्ह झाली होती.

त्याच वेळी, वुहानच्या प्रशासन आणि लॅब एजंट्सने या महिलेच्या बेपत्ता होण्याच्या वृत्ताचे खंडन केले होते आणि हे अहवाल इंटरनेटवरून काढून टाकले होते. या लोकांचा असा दावा आहे की ही महिला पूर्णपणे सुरक्षित आहे आणि तिने आपली नोकरी बदलली आहे. एका चिनी वृत्तसंस्थेने असेही म्हटले होते की त्यांनी या महिलेच्या नवीन कंपनीतील लोकांशीही चर्चा केली आहे. द मेलच्या वृत्तानुसार, चीन या महिलेला पुढे आणू शकला नसल्याने अनेक सिद्धांत चर्चेत येत आहेत. या सिद्धांतांनुसार एकतर या महिलेची हत्या केली गेली आहे किंवा तिला कैद करून ठेवण्यात आले आहे, जेणेकरुन कोरोना विषाणू साथीसंदर्भात या संस्थेच्या भूमिकेबद्दल ती जगाला सांगू शकणार नाही.

तथापि, काही काळापूर्वी वीचॅट मेसेजिंग सेवेवर असा दावा करण्यात आला होता की या महिला वैज्ञानिकाने त्यांच्या मित्रांना मॅसेज पाठविला आहे. त्यामध्ये असे लिहिले होते की, ‘माझे शिक्षक आणि विद्यार्थी, फार दिवसांपासून तुमच्याशी काही बोलता आले नाही. मी हुआंग येनलिंग आहे आणि मी जिवंत आहे. आपल्याला कोरोना अफवाशी संबंधित एखादा ईमेल आला असल्यास, प्रत्युत्तरात सांगा की हे सत्य नाही.’ पण त्यानंतर सोशल मीडियावरून ही महिला गायब असून संस्थेच्या वेबसाइटवर देखील या महिलेबद्दल काहीही लिहिले गेलेले नाही.

कोरोना महामारी आणि वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी यांच्यात काहीतरी संबंध असल्याचा दावाही केला जात आहे. ही संस्था झुनोटिक बॅट रोगांवर संशोधन करते. झुनोटिक रोग म्हणजे असे रोग जे प्राण्यांपासून मानवांमध्ये आणि मानवांपासून प्राण्यांमध्ये पसरतात. या संस्थेमधून कोरोना विषाणू साथीचा रोग पसरल्याचे अनेक सिद्धांत देखील आहेत.

अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटचे म्हणणे आहे की चीनचे प्रशासन वुहानच्या संशोधकांना मुलाखत करण्यापासून रोखत आहे. चीनी प्रशासन त्या लोकांशी देखील बोलण्याची परवानगी देत नाही जे लोक सन 2019 मध्ये या विषाणूमुळे सर्वात आधी पॉझिटिव्ह आले होते. चीन या विषाणूशी संबंधित महत्वाची माहिती सतत लपवत आहे. या दरम्यान, डब्ल्यूएचओची टीम देखील सर्व गतिरोध असूनही कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी वुहान शहरात दाखल झाली आहे.