Coronavirus : PAK पंतप्रधानांच्या घरापर्यंत पोहोचला ‘कोरोना’, 4 कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : पाकिस्तानच्या पंतप्रधान निवासस्थानातील चार कर्मचाऱ्यांचा कोरोना विषाणू तपासणीचा अहवाल सकारात्मक आला आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे आणि कोरोनाची प्रकरणे समोर आल्यानंतर जी विशेष खबरदारी घेतली पाहिजे ती पंतप्रधानांच्या निवासस्थानी घेतली जात आहे.

विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या निवासस्थानासंदर्भात कोरोना विषाणूची बातमी समोर येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी परोपकारी संस्था एधी फाऊंडेशनच्या प्रमुखांनी पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली आणि बैठकीनंतर त्यांच्यात कोरोनाची पुष्टी झाली. यानंतर इमरान खान यांची कोरोना टेस्ट करण्यात आली, ज्यात त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला.

सूत्रांनी सांगितले की पंतप्रधानांच्या निवासस्थानात इमरान खान यांच्या लोकांशी भेटी गाठी होत असतात, त्यामुळे पंतप्रधानांच्या घराचे नियमित निर्जंतुकीकरण होते. पंतप्रधानांच्या निवासस्थानावरील चार जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पंतप्रधानांचे राजकीय संवाद प्रकरणांचे सल्लागार शहबाज गिल यांनी म्हटले आहे की केवळ पंतप्रधान निवासस्थानच नाही तर कोणत्याही महत्त्वाच्या ठिकाणच्या कर्मचार्‍यांची नियमित चाचणी घेण्यात येते. तसेच त्यांनी हे स्पष्ट केले की कोरोना असल्याची पुष्टी झालेल्या चार कर्मचार्‍यांपैकी कुणीही अलिकडच्या काळात कोणत्याही महत्त्वपूर्ण व्यक्तीशी संपर्क साधला नव्हता.