मुंबईत साडेतीन हजार रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत

पोलीसनामा ऑनलाईन – देशात आणि राज्यात रूग्णांना किडनी वेळीच उपलब्ध होत नसल्याने गरजू रुग्णांची प्रतीक्षा यादी वाढत चालली आहे. देशात तब्बल दिडलाख तर मुंबईत ३,५६४ रूग्ण किडनीच्या प्रतिक्षेत आहेत. विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीने ही  माहिती दिली आहे.

किडनी निकामी झालेल्या रुग्णांना प्रत्यारोपणाविना दुसरा पर्याय नसतो. पण कायद्याच्या तरतुदीनुसार नातेवाईक देखील रूग्णाला किडनी दान करू शकतात. रक्त जुळणारी व्यक्ती नातेवाईकच असेल तर किडनी दान करणं शक्य होतं. अन्यथा ब्रेनडेड रुग्णाची किडनी दान करता येते. त्यामुळे किडनी वेळीच उपलब्ध होत नसल्याने गरजू रुग्णांची प्रतीक्षा यादी वाढत चालली आहे.

किडनीचं कार्य मंदावल्यास रुग्णांना आयुष्यभर डायलिसीसवर राहावं लागतं. पण यावर प्रत्यारोपण हा एक पर्याय आहे. पण ब्रेनडेड रुग्णाची किडनी मिळत नसल्याने रुग्ण प्रतीक्षेत आहेत. दरवर्षी देशभरात साडेतीन लाख ते चार लाख नव्याने आढळून येणारे रुग्ण शेवटच्या टप्प्यात असतात. तसंच रुग्ण आणि दात्याचे रक्तगट जुळणं गरजेचं असतं. त्यामुळे देशात प्रत्येकी ३० रुग्णांपैकी फक्त एक रुग्णाचं किडनी प्रत्यारोपण होत आहे. तर किडनी वेळेवर न मिळाल्याने प्रतीक्षा यादीत असणाऱ्या ९० टक्के रुग्णांचा मृत्यू होतोय. ही अतिशय चिंतेची बाब आहे.

मूत्रपिंडाची प्रतीक्षा यादी वर्षांनुवर्ष वाढतेय. पण या वाढत्या प्रतीक्षा यादीच्या तुलनेत दात्यांची संख्या अपुरी पडतेय. १९९७ ते २०१९ या कालावधीत आतापर्यंत मुंबईत ७३४ गरजू रुग्णाचं प्रत्यारोपण झालं असून ३,५६४ रुग्ण प्रतीक्षेत आहेत. तर २०१४ ते २०१९ या पाच वर्षांत मुंबईत ४४८ ब्रेनडेड रुग्णांनी अवयवदान करून १,१७१ गरजूंचं प्राण वाचवले. यात ७३४ किडनी रुग्णांना नव्यानं जीवदान मिळालं आहे. यंदाच्या वर्षी अवघ्या दोन महिन्यात २२ कॅडेव्हर डोनेशन झालं आहे. यात २३ किडनी, १५ यकृत, पाच हृदय आणि एका फुफ्फुसाचं प्रत्यारोपण करण्यात आलं आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे किडनी निकामी होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतेय. किडनी निकामी होण्याचे दोन प्रकार आहेत. याला अ‍ॅक्यूट किडनी इन्ज्युरी आणि कॉर्निक किडनी डिसीज असं म्हणतात. कॉर्निक किडनी डिसीज अनेक प्रकारच्या रोगांमुळे किडनीचं कार्य वर्षांनुवर्ष कमी होतं जातं. यावर कोणतेही औषध नसून रुग्णाला डायलिसीस हा एक पर्याय राहतो. अ‍ॅक्यूट किडनी इन्ज्युरी म्हणजे कुठलाही आजाराच्या दुष्परिणामांमुळे किडनीचं काम करणं बंद होतं. विशेषतः मधुमेहाचा आजार असलेल्या ३० ते ४० टक्के रुग्णांमध्ये क्रॉनिक किडनी डिसीज होण्याची शक्यता अधिक असते. याशिवाय उच्च रक्तदाबाचा त्रास, लठ्ठपणा, अति ताणतणाव आणि अधिक मात्रांमध्ये औषधांचं सेवन केल्यासही किडनी निकामी होऊ शकतात. उच्च रक्तदाब असणं, लघवी करताना त्रास जाणवणं, हाता-पायाला सूज येणं ही मुख्य कारणं आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like