‘अण्वस्त्र’ चाचणी तर करत नाही ना इराण ?, क्षेपणास्त्र स्थळावर झाला ‘ब्लास्ट’, आकाशात दिसला आगीचा गोळा

दुबई : इराणची राजधानी तेहराणच्या पूर्व पर्वतीय भागात एक स्फोट झाला आहे. विश्लषकांचे म्हणणे आहे की, हा स्फोट भूमिगत सुरूंग प्रणाली आणि क्षेपणास्त्र उत्पादन स्थळावर झाला आहे. शुक्रवारी घडलेल्या या घटनेत तेहराणच्या आकाशात एक विशाल आगीचा गोळा दिसून आला. हा स्फोट कशाचा झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या घटनेवरून पुन्हा एकदा इराणच्या न्यूक्लियर प्रोग्रामबाबत चर्चा सुरू झाली आहे.

स्फोटाचे कारण अद्याप समजलेले नाही. स्फोटानंतर इराणी सरकारची प्रतिक्रिया सुद्धा सामान्य होती. हा स्फोट अशा क्षेत्रात झाला आहे, ज्यावरून अंतरराष्ट्रीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की, इस्लामिक रिपब्लिकने अण्वस्त्र शस्त्रांसाठी दोन दशकांपूर्वी स्फोटकांची चाचणी केली होती. या स्फोटांनी घरे हादरली होती, खिडक्या तुटल्या होत्या. अल्बोर्ज पर्वतावर क्षितिजाजवळ आग आणि धुराचे लोट उसळले होते. यामुळेच शंका आणखी गडद होत चालली आहे.

ही घटना समोर आल्यानंतर संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते दाऊद आबदी यांचे वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी एवढेच सांगितले की, ही गॅस लीकेजची घटना होती, ज्यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. त्यांनी पर्वतीय क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी हे घडल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी इराणने म्हटले होते की, जर अमेरिका 2015 तील अणू करारातून बाहेर पडण्यासाठी माफी मागितली आणि याप्रकरणी नुकसान भरपाई दिली तर ते अमेरिकेसोबत अणूचर्चा सुरू करण्यास तयार आहोत.

यादरम्यान इराणच्या इस्लामिक रेव्होल्यूशनरी गार्डस कॉर्प्सने चार नव्या सैन्य शस्त्रांची माहिती सार्वजनिक केली आहे. या नव्या शस्त्रांमध्ये एक हेरगिरी करणारे ड्रोन आहे जे 12 हजार फुट उंचावरून टेहाळणी करू शकते. इराणी सेनेकडून ही घटना अशावेळी समोर आली आहे, जेव्हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून इराणवर शस्त्र खरेदीवरून लावलेले नवे प्रतिबंध वाढवण्याची शक्यता आहे.