सौदी अरेबियातील ‘चाबकाने फटके’ मारण्याची शिक्षा रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

रियाध : वृत्तसंस्था – सौदी अरेबियात शिक्षा म्हणून देण्यात येणारी चबाकाचे फटके मारण्याची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. सौदी अरेबियाच्या सुप्रीम कोर्टाने हा महत्त्वपूर्ण ऐतिहासीक निर्णय दिला आहे. एका वृत्तसंस्थेला मिळालेल्या सुप्रीम कोर्टाच्या जनरल कमिशनच्या निर्णयाच्या अधिकृत कॉपीनुसार आता सौदी अरेबियात, चाबकाच्या शिक्षेऐवजी कारावास व दंड ठोठावला जाणार आहे.

मिळालेल्या या कॉपीमध्ये म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय राजा सलमानच्या निर्देशानुसार आणि प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली सुरु करण्यात आलेल्या मानवाधिकार सुधारणांचा विस्तार आहे.

सौदी अरेबियामध्ये विविध गुन्ह्यांमधील दोषींना चाबकाने फटके मारण्याची शिक्षा अद्याप पर्यंत लागू होती. परंतु आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे सौदी अरेबियात दोषींना चाबाकाने फटके देण्याची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. एका वृत्तानुसार सौदी अरेबियामध्ये कायदा प्रणाली नाही. याठिकाणी न्यायाधीश शरीयत किंवा इस्लामिक कायद्यानुसार आपल्या पद्धतीने दोषींना शिक्षा देतात.

मानवाधिकार कार्यकर्त्यांनी असा आरोप केला आहे की सौदी अरेबिया जगातील अशा देशापैकी एक देश आहे ज्या ठिकाणी मानवाधिकारांचे सतत उल्लंघन होत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. एवढेच नाही तर समीक्षकांचे असे ही म्हणणे आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर देखील या ठिकाणी सक्ती असून काही प्रकरणांमध्ये सरकार विरोधात काही बोलल्यास अटक देखील केली जाते.