जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेत बुलडाण्याच्या मोनाली जाधवला 2 सुवर्णांसह 3 पदकं

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाईन – चीनमध्ये झालेल्या जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्यातील महिला पोलीस कॉन्स्टेबलने ठसा उमटवला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जलंब पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेली महिला पोलीस कॉन्स्टेबल मोनाली जाधवने ”मध्ये 720 पैकी 716 गुण मिळवत दोन सुवर्ण पदकं आणि एक कांस्यपदक मिळवले आहे.

चीनच्या चेंगडू येथे 8 ते 18 ऑगस्टदरम्यान जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा झाल्या. यामध्ये मोनाली जाधवने ‘टार्गेट आर्चरी’मध्ये 720 पैकी 716 गुण मिळवत दोन सुवर्ण पदकं आणि ‘थ्रीडी’ आर्चरी प्रकारात कांस्य पदक पटकावले आहे. मे महिन्यात शांघाय येथे झालेल्या विश्व स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करत जागतिक स्तरावर नववे स्थान पटकावले होते. मोनाली जाधवला तिरंदाजी प्रशिक्षक चंद्रकांत इलग, सुरेश शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले. सैन्यदलातून निवृत्त होऊन मोनालीच्या बॅचमध्ये महाराष्ट्र पोलीसमध्ये भरती झालेले चंद्रकांत टिळक यांच्या मार्गदर्शनात तिने खेळायला सुरुवात केली. आतापर्यंत तिरंदाजीच्या अनेक स्पर्धांमध्ये मोनालीने यश मिळवले आहे.

मोनाली बारावीत असताना तिच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. आई आणि भाऊ मजुरी करुन घरचा प्रपंच चालवत होते. त्यांना हातभार लावावा म्हणून ती महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून भरती झाली. 2013 मध्ये पोलीस दलात भरती झालेली मोनाली जाधव ही बुलडाणा जिल्ह्यातील जलंब पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.

You might also like