ना अमेरिकेत ना सौदीमध्ये सोन्याची सर्वात मोठी खाण आहे ‘या’ देशामध्ये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील सौनभद्रमध्ये सापडलेल्या सोन्याच्या खाणीची चर्चा सध्या सर्वत्र आहे. सौनभद्रमध्ये सापडलेली सोन्याची खाण चर्चेचा विषय बनली असताना भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण (जीएसआय) यांनी या ठिकाणी तीन हजार टन सोन्याचा साठा असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. जगात सोन्याची सर्वात मोठी खाण कोठे आहे हे आपल्याला माहित आहे का ? तर ती आहे उत्तर इंडोनेशियाच्या ग्रॅसबर्ग या ठिकाणी.

ग्रॅसबर्ग विषयी…
इंडोनेशियातील ग्रॅसबर्ग येथील सोन्याची खाण जगातील सर्वात मोठी खाण असल्याचे म्हटले जाते. ही खाण ग्रॅसबर्गच्या पपुआ या ठिकाणी आहे. या ठिकाणी तांब्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तांब्याचा साठा या ठिकाणी आहे. ग्रॅसबर्ग या खाणीमध्ये हजारो कामगार दररोज काम करत असतात. 1936 साली काही डच वैज्ञानिकांनी या खाणीचा शोध लावला असून या खाणीतून सोने बाहेर काढण्यासाठी 19500 कामगार दिवसरात्र काम करतात.

ग्रॅसबर्ग या सोन्याच्या खाणीतून सोने बाहेर काढण्याचे काम फ्रीपोर्ट – मॅकमोरन ही अमेरिकन कंपनी करते. या खाणीची 51 टक्के मालकी इंडोनेशियाच्या सरकारकडे आहे. या खाणीतून दरवर्षी हजारो टन सोने, चांदी आणि तांबे काढले जाते. या खाणीचे क्षेत्रफळ 5 लाख 27 हजार आहे. हे सोने काढण्यासाठी दोन मोठ्ठे खड्डे या ठिकाणी आहे. एक खुला आणि एक भूमिगत असून या दोन्ही ठिकाणाहून हजारो टन सोने बाहेर काढले जाते. या खाणीमध्ये तब्बल 72000 कोटी रुपयांचे सोने असण्याची शक्यता आहे. जगातील सर्वात मोठी दुसरी सोन्याची खाण अमेरिकेतील नेवाद येथील एल्कोव या ठिकाणी आहे. या खाणीचे क्षेत्रफळ 6 लाख 91 हजार एकर आहे.

दरम्यान, सोनभद्र येथे मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याने सोनभद्र हे नाव चर्चेत आले. उत्तर प्रदेशाच्या खाण संचालनालयाने सोनभद्रमध्ये सोन्याचे साठे असल्याची माहिती दिली होती. या ठिकाणी हजारो टन सोने असल्याचे सरकारला कळवण्यात आले होते. यानंतर या ठिकाणी सोने असल्याच्या चर्चांना उधाण आले. भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेने या ठिकाणाची पाहणी केल्यानंतर या ठिकाणी हजारो टन सोन्याचा साठा असल्याचा दावा फेटाळून लावला आहे.