चीनने असे काही केली की त्यामुळे जगभरातील अँकरच्या मनात भरली धडकी

बिजिंग : वृत्तसंस्था – वृत्त वाहिन्यांच्या क्षेत्रात क्रांती घडवणारी कामगिरी चीनच्या झिन्हुआ या सरकारी वृत्त वाहिनीने केली आहे. मात्र, चीनच्या या कामगिरीची धडकी जगभरातील वृत्त निवेदकांनी घेतली आहे. कारण सध्याच चॅनेलच्या दुनियेत गळेकापू स्पर्धा सुरु आहे. त्यात असे रोबोट आले तर आपली सद्दी आता संपणार का या चिंतेने त्यांना ग्रासले आहे.

अगदी २४ तास न थकता आणि न कंटाळता बातम्या वाचणारा विलक्षण न्यूज अँकर (वृत्तनिवेदक) या वृत्तवाहिनीने शुक्रवारी इंटरनेट कॉन्फरन्सद्वारे जगासमोर सादर केला. खऱ्याखुऱ्या माणसाप्रमाणे बातम्या सांगणारा हा आभासी (व्हर्चुअल) न्यूज अँकर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) या तंत्रज्ञानावर काम करणार आहे.

चॅनेलमध्ये वृत्त निवेदकांना सर्वाधिक महत्व असते. ते कशा पद्धतीने बातम्या वाचतात. अचानक आलेल्या बातम्यांमुळे त्याचा त्यांच्यावर मानसिक परिणाम होत असतो. तो बातम्या वाचताना दिसून येऊ नये, यासाठी ते काळजी घेत असतात. तरीही अनेकदा त्यांना आपल्या भावना आवरणे शक्य होत नाही. अनेकदा बातम्या वाचताना वृत्त निवेदकांकडून चुका घडतात. अशा अनेक बाबी या रोबोटकडून वाचल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये चुका टाळता येणे शक्य होणार आहे.

मात्र, यामुळे सध्या न्युज अँकर म्हणून लोकप्रिय असलेल्यांच्या पोटात गोळा आला आहे. हा आभासी न्यूज अँकर थेट आपल्या पोटावरच पाय देणार की काय अशी शक्यता त्यांच्या मनात डोकावून लागली आहे. बहुतेक सर्व चॅनेलवरील जे काही कार्यक्रम लोकप्रिय ठरत असतात, त्यात न्युज अँकरची भूमिका अतिशय महत्वाची ठरत असते. त्याच्यावरच त्या चॅनेलचा टीआरपी वाढत असतो. त्यामुळे या न्युज अँकरला महत्वाचे स्थान असते. आभासी न्युज अँकरमुळे आपले स्थान धोक्यात येऊ शकते असे या न्युज अँकरला वाटत असून या न्युज अँकरमुळे भविष्यात गल्लेलठ्ठ पगाराची नोकरी मिळण्याची आशा बाळगणाऱ्याना हा एक प्रकारे इशारा असल्याचे बोलले जात आहे.

झिन्हुआ वृत्तवाहिनीने आपल्या ट्विटर हँडलवरून याबाबत दोन मिनिटांचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे. तो पाहणे अतिशय रंजक आहे. अगदी मानवी अँकरसारखाच हुबेहूब दिसणारा हा अँकर खऱ्याखुऱ्या अँकरसारखाच बातम्या वाचेल, असा दावा ‘झिन्हुआ’ने केला आहे. विशेष म्हणजे तो चीनमधील कोणत्याही शहरातून किंवा ठिकाणाहून अँकरिंग करू शकणार आहे. ‘क्यू हो’ असे या नव्या न्यूज अँकरचे नाव आहे. हा आभासी न्यूज अँकर यंत्रमानव नाही किंवा मानवाचे थ्री डी डिजिटल मॉडेलदेखील नाही. हा अँकर म्हणजे माणसासारखे दिसणारे एक अ‍ॅनिमेशन आहे. आभासी न्यूज अँकर सलग २४ तास बातम्या वाचू शकतो. वेळोवेळी ब्रेकिंग न्यूज देण्यासाठीही या अँकरचा चांगला उपयोग होईल, असे वाहिनीने म्हटले आहे. या अँकरचा आवाज, शब्दफेक, ओठांची हालचाल, चेहऱ्यावरील हावभाव हे एखाद्या व्यावसायिक न्यूज अँकरसारखेच असेल, असे वाहिनीने म्हटले आहे. याचा उपयोग वृत्तवाहिनीच्या वेबसाइटवर तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील केला जाऊ शकतो. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊ शकेल; तसेच कार्यक्षमताही वाढेल, असा दावा शिन्हुआने केला आहे.

आभासी न्यूज अँकर निर्माण करण्यात ‘सोगो’ या चिनी सर्च इंजिनची भूमिका महत्त्वाची आहे. सोगोने खास ‘झिन्हुआ’साठी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाद्वारे सध्या चिनी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये बातम्या वाचणारे दोन आभासी न्यूज अँकर तयार करण्यात आले आहेत. त्यांचे प्रात्यक्षिक शुक्रवारी दाखवण्यात आले. ‘हेल्लो, तुम्ही पाहत आहात इंग्रजी बातम्यांचा कार्यक्रम. मी बीजिंगमधून ‘एआय’ न्यूज अँकर बोलतोय. तुम्हाला सतत माहिती देण्यासाठी मी न थकता काम करणार आहे,’ अशा यंत्रमानवासारख्या आवाजात या वेळी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

या आभासी न्युज अँकरविषयी विरोधही प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. दर्शक दिवसभर एकसारखा चेहरा पाहून कंटाळतील. या न्युज अँकरच्या बोलण्यात भावभावनांचा ओलावा नसल्याने सुरुवातीला त्यात चांगल्या वाटल्या तरी पुढे लोकांना त्यात आवडतीलच असे नाही. यशिवाय आपल्यासमोर बोलणारा रोबोट आहे, हे लोकांच्या लक्षात आले की ते त्याच्याशी रिलेक्ट करु शकणार नाही़ अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.