खुशखबर ! आता आलं सर्वात स्वस्त ‘कोरोना’च्या तपासणीचं किट, फक्त 3 तासात टेस्टचा ‘रिपोर्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – किटची गुणवत्ता लक्षात घेता आयसीएमआरनेही याला आपली मान्यता दिली आहे. केवळ ६५० रुपये कोरोनाची तपासणी करणारी ही किट आयआयटी दिल्लीचे प्रोफेसर पेरुमल, प्रोफेसर कुंडू, प्रोफेसर मेनन, डॉ. प्रशांत, प्रोफेसर जे. गोम्स, डॉ. अखिलेश, डॉ. आशुतोष आणि डॉ. सोनम यांच्या टीमने संशोधन केल्यानंतर तयार केली गेली आहे.

बुधवारी आयआयटी दिल्लीचे संचालक व्ही, रामगोपा राव आणि त्यांच्या टीमने कोरोनाची ही किट केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांच्या उपस्थितीत सार्वजनिक केली.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक म्हणाले, “६५० रुपयांत कोरोनाची तपासणी करणारी दिल्ली आयआयटीची ही किट अवघ्या ३ तासात चाचणी अहवाल देईल. या किटच्या येण्याने कोरोना चाचणीची क्षमता, गुणवत्ता आणि विश्वासार्हता वाढली आहे. आयसीएमआरनेही दिल्ली आयआयटीच्या या किटवर उत्कृष्टतेचा शिक्कामोर्तब केले आहे.”

आयआयटी दिल्लीतर्फे निर्मित कोरोना टेस्ट किट लवकरच खुल्या बाजारात उपलब्ध होईल. यासाठी आयआयटी दिल्लीने न्यूटेक मेडिकल डिव्हाइस नावाच्या कंपनीबरोबर भागीदारी केली आहे. या कंपनीच्या मदतीने मोठ्या प्रमाणात कोरोना टेस्ट किटचे उत्पादन आणि मार्केटिंग केले जाईल. या कोरोना टेस्ट किटमधील आरटीपीसीआर किटची किंमत फक्त ३९९ रुपये आहे. उर्वरित अंदाजे २५० रुपये अन्य प्रक्रिया आणि सहाय्यक उपकरणांसाठी घेतले जातील.

आयआयटी दिल्लीच्या म्हणण्यानुसार, काही सरकारी रुग्णालयात ही किट विनामूल्य दिली जाईल, जेणेकरुन तिथे येणाऱ्या रुग्णांची तपासणी नि:शुल्क करता येईल. ही कोरोना टेस्ट किट बाजारात आणण्यापूर्वी कित्येक प्रकारच्या ठोस चाचण्या केल्या गेल्या आहेत. या सर्व चाचण्यांमध्ये ही कोरोना तपासणीसाठी योग्य ठरली आहे. त्याचे निकाल शंभर टक्के बरोबर असल्याचे आढळले आहे. अशात आता कोरोना चाचणी स्वस्त होईल, तसेच अधिक विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण देखील केली जाऊ शकते.

विशेष म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात कोरोना तपासणी फीसाठी ५००० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात होते. मात्र नंतर त्याची किंमत निम्मी केली गेली. आता आयआयटी दिल्लीने बनवलेली कोरोना टेस्ट किट सध्या आकारत असलेल्या किमतीच्या तुलनेत एक चतुर्थांश किंमतीत उपलब्ध असेल.