१५ लाख नगरकरांचा विश्वविक्रमी सामूहिक योगा !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केलेला आहे. सुमारे पाच हजार वर्षांची अमूल्य परंपरा असणारी योग विद्या ही भारताने जगाला दिलेली वैभवशाली देणगी आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन यांच्यावतीने जिल्हाक्रीडाधिकारी कविता नावंदे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्हाभरामध्ये सुमारे १५ लाख नगरकर योगसाधना करून जागतिक विश्वविक्रम करणार आहेत. जिल्हाभरातील नागरिकांनी स्थानिक विविध शाळा व संस्थामध्ये व अहमदनगर शहरातील नागरिकांनी जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क, नगर येथे शुक्रवार, दि. २१ जून रोजी सकाळी सात ते आठ या वेळेमध्ये या महायोग विश्वविक्रमी सोहळ्यात सहभागी होऊन योगाचा प्रचार-प्रसार व सहभागासाठी उपस्थित राहावे या दिवशी जिल्‍हा क्रीडा संकुल सर्वांसाठी खुले राहणार आहे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी केले आहे.

आयुष मंत्रालय, भारत सरकार यांनी ‘योगा लोकेटर’ हे ॲप विकसित केले असून या ॲपचा देखील वापर करावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे. शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांच्या मार्गदर्शनातून जिल्हाभरामध्ये विविध शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, एन. एस. एस., एन. सी. सी., स्काऊट, गाईड, तांत्रिक शैक्षणिक संस्था, नर्सिंग कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक त्यांच्या आस्थापनांमध्ये तसेच तालुका क्रिडा संकुलांमध्ये जागतिक योग दिनाच्या निमित्ताने योगसाधना करणार असून राज्यातील सर्वात मोठा योग सोहळा अहमदनगरचा ठरण्याची शक्यता आहे.

जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क येथे दिनांक २१ जून रोजी योग दिनानिमित्‍त ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार संग्राम जगताप, महाराष्ट्र राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, जि.प अध्यक्षा शालिनी विखे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, जिल्हा पोलिस अधीक्षक इशू सिंधू, महापौर बाबासाहेब वाकळे, मनपा आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपमहापौर मालनताई ढोणे, नगरसेवक विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी तसेच शहरी शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक तसेच शासकीय तंत्रनिकेतन, मनपा शिक्षण मंडळ, नेहरू युवा केंद्र, जिल्हा योग संघटना, अहमदनगर एज्युकेशन सोसायटी, एम. एम. वाय. टी. सी., जिजाऊ हास्य क्लब, जिल्हा मैदानी खेळ संघटना, रोटरी क्लब, लायन्स क्लब, मॅक्सीमस स्पोटर्स क्लब, योगा टीचर, आर्ट ऑफ लिव्हींग आदि संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी तसेच कर्मचारी, आंतरराष्ट्रीय खेळाडू, कलाकार, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, कौटुंबिक धार्मिक, आध्यात्मिक, औद्योगिक, साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत.

आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार सुमारे चाळीस मिनिटांच्या सामूहिक योग कार्यक्रमामध्ये प्रार्थना, पूरक हालचाली, विविध आसने, प्राणायाम, ध्यानधारणा व ओंकार, संकल्प आणि प्रार्थना आदी कृती कार्यक्रम तज्ज्ञ प्रशिक्षणाच्या माध्यमातून घेतले जाणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शाळेचा गणवेशामध्ये व इतर योगसाधकांनी शक्यतो पांढऱ्या पोशाखामध्ये योगसाधनेसाठी स्वतःच्या आसनासह सकाळी सहा वाजता उपस्थित राहावे. प्रशासनाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्या संकल्पनेतून योगासने व योग दिनाचा इतिहास दर्शवणाऱ्या सुमारे ५० सेल्फी पॉइंटची यंत्रणादेखील उभारण्यात आलेली असून योगसाधकांनी या सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढून तो खालील मोबाईल क्रमांकाच्या व्हाट्सअपवर पाठविण्‍यात यावे. त्‍यातून पारितोषिके दिली जाणार आहेत.

सहभागी शाळांची बस व्यवस्था भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या मैदानात करण्यात आलेली असून इतर नागरिकांसाठी रिमांड होम समोरील जागा, दोन्ही टिळक रोड व क्रीडा संकुलाच्या बाहेरील भाग या ठिकाणी करण्यात आलेली आहे. महात्मा गांधी पुतळ्या जवळील गेट क्रमांक ४ व ५ मधून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे व इतर नागरिकांना इतर गेटमधून प्रवेश दिला जाणार आहे. विविध व्यक्ती, स्वयंसेवी संस्था-संघटना यांनी सहभाग व नाव नोंदणीसाठी क्रीडाधिकारी दिपाली बोडखे (९८६०० २८०२०) योगशिक्षक अमोल बागुल (९५९५ ५४ ५५५५ ) श्रीनिवास नाबरिया (९४२२ ४६७२१७) व भरत बागरेचा (९४२३ ७९३३४९) यांच्याशी या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे. मैदानावर आल्यानंतर देखील परत नाव नोंदणी करायची आहे नाव नोंदणी करणाऱ्या संस्था संघटनानांच शासनाची प्रमाणपत्रे प्रदान केली जाणार आहेत. जास्तीत जास्त योगसाधकांनी या जागतिक विश्व विक्रमात उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.