चिंताजनक ! महाराष्ट्रात ‘म्युकरमायकोसीस’चे 2000 बाधित रूग्ण तर आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने थैमान घातले असतानाच आता म्यूकरमायकोसिस हा आजार अनेकांना होत आहे. या आजाराचे राज्यात 2 हजार रुग्ण आढळले असून 8 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या आजाराबाबत नागरिकांनी सर्तकता बाळगण्याची गरज आहे. हा आजार झाल्यानंतर 14 इंजेक्शन घ्यावे लागतात. या इंजेक्शनचे दर महाग असल्यामुळे गोरगरीब नागरिकांच्या आवाक्याबाहेर खर्च जात आहे. त्यामुळे या आजारावरील उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की, कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन दिला जातो. तेंव्हा त्या ऑक्सिजनमधील पाणी शुध्द असले पाहिजे. पाणी शुद्ध नसल्यास हा बुरशीजन्य म्युकरमायकोसिसची लागण होते. या आजाराची लक्षणे ही नाक, ओठाजवळ काळे डाग पडतात. हे डाग दिसल्यास तात्काळ उपचार सुरु केले पाहिजेत. आजारावरील एमपी- एंपोथेरिसीन औषध सर्वत्र उपलब्ध आहे. मागणी वाढल्यामुळे या औषधाच्या किंमती अडीच हजारावरून थेट 6 हजारावर पोहचले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना ते परवडणारे नाही. त्यामुळे या आजाराचा उपचार जन आरोग्य योजनेत केला जाणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान आरोग्य मंत्री टोपे यांनी सोमवारी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. बैठकीत अनेक खासगी रूग्णालय हे रूग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांकडून अधिकचे बिल आकारत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे आता दरररोज सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत सरकारी कर्मचारी कोविड सेंटरवर तैनात केले जाणार आहेत. त्यांनी बिलावर स्वाक्षरी केल्यावरच ते बिल रूग्णालयात भरावे लागणार आहे. जालन्या प्रमाणेच अन्य जिल्हाधिकाऱ्यांनी देखील याची नोंद घेऊन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे निर्देश टोपे यांनी दिले आहेत.