चिंताजनक ! नाशिकमध्ये Mucormycosis ने 8 जणांचा मृत्यू, 166 जण बाधित

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाने थैमान घातलेल्या नाशिक जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता आटोक्यात येत आहे. मात्र आता जिल्ह्यात म्युकरमायकोसिस या आजाराने सर्वांचीच झोप उडवली आहे. नाशिकमध्ये म्युकरमायकोसिस आजाराने 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 166 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नाशिक जिल्हा हादरून गेला आहे. परिणामी आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे.

अगोदरच कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. त्यात ह्या आजाराची भर पडल्याने आरोग्य यंत्रणेची तारेवरची कसरत सुरु झाली आहे. दरम्यान उपचारासाठी आवश्यक एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा साठा नाशकात दाखल झाला असून, पात्र रूग्णांना, सिव्हिल हॉस्पिटलमधून वाटप केले आहे. कोरोनातून बरे झालेल्यांना म्युकरमायकोसिसचा धोका आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 166 म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 34 रुग्ण बरे झाले असून 132 रुग्णांवर उपचार सुरू आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांपैकी 106 रुग्णांवर खाजगी हॉस्पिटलमध्ये, तर 24 रुग्णांवर कोविड सेंटरमध्ये, दोघांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे कोरोनानंतर आता म्युकरमायकोसिसला देखील गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. आरोग्य यंत्रणा त्यादृष्टीने पावले उचलत आहे. डिस्चार्ज दिलेल्या 34 रुग्णांपैकी 33 रुग्णांनी खाजगी तर एका रुग्णाने सरकारी रुग्णालयात उपचार घेत म्युकरमायकोसिसवर मात केली आहे.