चिंताजनक ! आरोग्य मंत्रालयाची चिंता वाढवणारी आकडेवारी, 98 टक्के लोकसंख्या अद्याप कोरोना धोक्याच्या छायेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. या लाटेत देशात जगातील विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली. आता हळूहळू नवीन रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोरोना मृत्यूची लाट आल्याचे दिसून येत आहे. देशात कोरोनाची लाट ओसरू लागल्याने समाधान व्यक्त करण्यात येत असताना केंद्रीय आरोग्य विभागाने सादर केलेल्या आकडेवारीमुळे चिंता अधिक वाढली आहे. आरोग्य विभागाने मंगळवारी दिलेल्या आकडेवारीनुसार भारतातील एकूण लोकसंख्येच्या 2 टक्के लोकांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. तर तब्बल 98 टक्के लोकसंख्या ही अद्यापही धोक्याच्या छायेत आहे.

आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, इतर देशांमध्ये कोरोनामुळे बाधित झालेल्या लोकसंख्येची टक्केवारी जास्त आहे. परंतु भारतात हे प्रमाण कमी असून संक्रण रोखण्यात भारत यशस्वी ठरला आहे. हे केवळ वैद्यकीय मदतीमुळे शक्य झाले आहे. परंतु काही लोकांनी सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या संख्येवर शंका उपस्थित केली आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सरकारने नॅशनल सीरो सर्व्हेच्या निष्कर्षांकडे दुर्लक्ष केले आहे. ज्यामध्ये देशातील सुमारे 20 टक्के लोकसंख्या कोरोनामुळे बाधित झाली असल्याचे सांगण्यात येत होते. इंडियन कौन्सिल ऑफ इंडिया (ICMR) कडून करण्यात आलेल्या सीरॉलॉजिकल सर्व्हेमध्ये देशातील 21.4 टक्के तरुण लोकसंख्या मागील वर्षी डिसेंबर महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोना बाधित झाली होती, असे सांगितले जात आहे.