सुखदुःखाच्या शर्यतीत सुखासाठीचा ‘हा’ एकच ‘राज’मार्ग !, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – जीवनात सुखदुःखाच्या शर्यतीत सुखासाठीचा एकच राजमार्ग संतांनी दाखवला तो म्हणजे ईश्वराला नामस्मरणाने शरण जाणे. पण हे शरण जाताना आम्ही काहीतरी अपेक्षा ठेवतोच. संतांचे मात्र तसे नाही. ते निरपेक्षपणे निर्मळ अंतकरणाने मनी कोणताही किंतु न ठेवता आराधना करतात. संत नामदेवांनी तर भक्तीचा आदर्शच ठेवलाय.

परमेश्वर प्राप्तीची भटकंती नकोच, ते विठ्ठल प्रेमात असे काही रममाण झाले की त्यांना इतर तिर्थाची गरज उरली नाही. सर्वत्र विठ्ठलच दिसु लागला. त्यांचे माता पिता, गुरु, गोत्र… सगळ्यात देव दिसला. हा विठ्ठल भेटल्याने त्यांना आता कळीकाळाचीही भीती उरली नाही. आनंदनिधान गवसले. प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे. भोग येण्याचा समय आला म्हणजे बुद्धीवर परिणाम करतो. तिथें आपण सावध राहून सत्पुरुषाच्या सांगण्याप्रमाणेच वागलो तर प्रारब्धाचा जोर मंदावल्यावाचून राहणार नाही.

सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वता एवढे ॥
धरी धरी आठवण । मानी संताचे वचन ॥
नेले रात्रीने ते अर्धे । बाळपण जराव्याधे ॥
तुका म्हणे पुढा । घाणा जुंती जसी मूढा ॥

माणसाला आयुष्यात मिळणारे सुख हे जवसाच्या बी समान छोटे असते आणि दुःख मात्र पर्वताएवढे असते. त्यामुळे, तुकाराम महाराज म्हणतात, संतांची वचने मानून त्याप्रमाणे आचरण करा, देवाची नित्य आठवण ठेवा.

माणसाचे अर्धे आयुष्य झोपेत जाते. उरलेल्या आयुष्यापैकी बालपण, वृद्धापकाळ आणि आजारपण हे बरेच आयुष्य खातात. या काळात माणुस काहीही साधना करु शकत नाही. जे थोडे फार आयुष्य उरते, ते ही माणुस मूर्खासारखा घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे संसाराचे ओझे वाहण्यात वाया घालवतो.

म्हणून प्रारब्धाने मिळालेल्या जीवनाचे सोने केले पाहिजे. भगवंत भक्तीत रममाण होऊन देव आपलासा केला पाहिजे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/