तुळस, कडूनिंबाप्रमाणेच आरोग्यदायी फायदे मिळतात पिंपळापासून, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भारतात पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. हिंदू धर्मात या झाडाला अनन्यसाधारण महत्व आहे. पिंपळाच्या झाडाचे जेवढे धार्मिक महत्व आहे तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत. आयुर्वेदानुसार पिंपळाच्या झाडाचा प्रत्येक भाग अर्थात बी, साल, पान आणि फळ औषधी गुणांनी परिपूर्ण आहेत. दमा, कावीळ आणि मधुमेहासारख्या आजारांसाठी पिंपळाच्या पानांचा वापर करण्यात येतो. तर आज आपण पिंपळाच्या पानांचे फायदे आणि त्याचा वापर कसा करायचा याबाबत जाणून घेणार आहोत.

>> हृदय निरोगी ठेवते

पिंपळाची पानं हृदयाचे आजार असलेल्यांसाठी रामबाण उपाय असून, ते हृदयाचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यासाठी पिंपळाची पाने रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून दिवसभर प्या. दिवसातून २ ते ३ वेळा पाणी प्यायल्याने हृदय निरोगी राहते.

>> मधुमेहासाठी फायदेशीर

पिंपळाच्या पानांचा रस रक्तातील साखरेची पातळी कमी कमी करुन, मधुमेह नियंत्रित करण्यास उपयुक्त ठरतात. पिंपळाची पानाने इन्सुलिन आणि ग्लुकोज वापरण्याची शरीराची क्षमता वेगाने ऊर्जेत बदलतात.

>> अतिसारापासून तात्काळ आराम

आतड्यांमधील असलेल्या आव या संसर्गामुळे रक्त आणि श्लेष्माचा अतिसार होतो. हा संसर्ग जिवाणू आणि परजीवी जंतुसंसर्गामुळे होतो. जर हा संसर्ग अमिबामुळे झाला असेल तर अन्य समस्यांसह गंभीर रक्तस्त्राव होणारा अतिसार होऊ शकतो. आव पडण्यापासून आराम मिळण्यासाठी पिंपळाची पाने, कोथिंबीर आणि थोडी साखर एकत्र करुन हळू हळू चघळा.

>> श्वसन रोग, दम्यापासून आराम

पिंपळाचे पाने आणि साखर दुधात उकळून प्या. पिंपळाच्या पानांचे गुणधर्म संपूर्ण दुधात उतरल्यावर एक उकळी येऊ द्या. त्यानंतर थंड झाल्यावर प्या. दिवसातून दोनदा हा उपाय केल्यावर श्वसन रोगात आराम भेटतो.

>> कावीळची लक्षणे कमी करतात

कावीळची लक्षणे कमी करण्यासाठी पिंपळाची पाने उपयुक्त ठरतात. त्यासाठी पाने आणि खडीसाखर यांचा रस बनवा. दिवसातून २ ते ३ वेळा हा रस पिऊ शकता.

>> बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी

बद्धकोष्ठतेमुळे मूळव्याध उद्भवू शकतो. त्यासाठी दुधात पिंपळाच्या पानांची पावडर, गूळ आणि बडीशेप मिसळा, झोपण्याआधी दूध प्या. त्यामुळे बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होईल.

(टिप : कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या)