दिलासादायक ! ‘कोरोना’चा वाईट काळ संपला, पण काळजी घेण्याची गरज

नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वी आपल्या देशात १० लाखांहून अधिक कोरोना सक्रीय रुग्ण होते. आज भारतात जवळपास ३ लाख सक्रीय रुग्ण आहेत. कोरोनाच्या बाबत आपण एका वाईट स्थितीतून बाहेर पडतोय, असे मला वाटते. पण अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले.

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने १ कोटींचा टप्पा पार केला. तसेच देशात या वर्षी ३० जानेवारीला पहिला रुग्ण सापडला होता. त्या घटनेला आता ११ महिने पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन बोलत होते.

ते म्हणाले की, जगात भारताचा रिकव्हरी रेट सर्वाधिक आहे. आपला रिकव्हरी रेट ९५ ते ९६ टक्क्यांच्या दरम्यान आहे. अमेरिका, इंग्लडसह युरोपातील प्रगत देशांचा रिकव्हरी रेट ६० ते ८० टक्क्यांच्या दरम्यान आहे़ भारताचा मृत्यु दरही १.४५ टक्के इतका जगात सर्वात कमी आहे. एकूण रुग्णांपैकी ९५ लाखांहून अधिक रुग्ण बरे होऊन आपल्या कामाला गेले आहेत. हे पाहता देशातील सर्वात वाईट काळ आता संपलाय असे वाटते. मात्र, तरीही खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

लसीबाबत हर्षवर्धन म्हणाले की, आमचे पहिले प्राधान्य हे सुरक्षा आणि लसीची प्रभाव याला असणार आहे. आम्हाला त्यावर तडजोड करायची नाही. मला वैयक्तिकरित्या वाटते, कदाचित जानेवारीच्या कोणत्याही आठवड्यात आम्ही प्रथम भारतीयांना कोविड लस देण्याच्या स्थितीत असू. केंद्र सरकार आणि राज्य सरकारे मागील ४ महिन्यांपासून राज्य, जिल्हा व ब्लॉकस्तरावर लसीकरणाच्या दृष्टीने तयारी करत आहेत. देशभरात हजारो मास्टर ट्रेनरांनी प्रशिक्षण घेतले आहे. आम्ही राज्यस्तरावर प्रशिक्षण दिले आहे. सुमारे २०० जिल्ह्यात २० हजारांना प्रशिक्षण दिले आहे.